बेपत्ता चित्रपट निर्माता जिरावाला यांचा मृत्यू   

अहमदाबाद : गुजराती चित्रपट निर्माता महेश जिरावाला यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.ते अपघाताच्या दिवसापासून बेपत्ता होते. डीएनए अहवालात त्यांच्या मृत्युची पुष्टी झाली आहे. जिरावाला ३४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही क्षणात रहिवासी भागात कोसळले होते. यामध्ये विमानातील २४१ जणांसह एकूण २७० जणांचा मृत्यू झाला होता. तर, विमानातील एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला होता.
 
एअर इंडियाचे विमान जिथे कोसळले त्या ठिकाणी महेश यांची स्कूटर जळालेल्या अवस्थेत सापडली होती. महेश यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले होते, ते शेवटचे अपघातस्थळीच होते.महेश यांचे कुटुंबीय त्यांचे निधन झाले, हे स्वीकारायला तयार नव्हते. स्कूटरचा चासी नंबर आणि डीएनए अहवाल दाखविल्यानंतर कुटुंबीयांनी पार्थिव स्वीकारले असे, सह पोलिस आयुक्त जयपालसिंह राठोड यांनी सांगितले.
 
कुटुंबीयांची शंका दूर करण्यासाठी आणि खात्री पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांची जळालेली स्कूटरसह इतर पुरावे गोळा केले आणि सादर केले, असेही ते म्हणाले.बरेच मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते. त्यामुळे डीएनए चाचण्या केल्या जात आहेत, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.महेश हे कोणाला तरी भेटायला निघाले होते. मात्र, बराच वेळ घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या नंबरवर फोन केला. मात्र, तो बंद आढळला. त्यानंतर, त्यांनी पोलिसांना कळवले.

Related Articles