ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव   

पुणे : बालगंधर्व परिवार ट्रस्टचा ५७ व्या वर्धापन दिन सोहळा बालगंधर्व रंग मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा सोहळा २४ ते २६ जूनपर्यंत रंगणार असून ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 
 
या तीन दिवसीय सोहळ्यात विविध कला प्रकारातील कलाविष्कार सादर केले जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यासह संगीत नाटक विभाग, गद्य नाटक विभाग, पत्रकारिता, तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा देखील बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,  खासदार अमोल कोल्हे आदी यांची उपस्थिती असणार आहे. 
 
सोहळ्याची सुरूवात २४ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंजली राऊत यांच्या गणेश वंदनाने होईल. यामध्ये संगीत नाट्यप्रवेश, कवि सुरेश मट यांचे  गजल व जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचे सादरीकरण केले जाईल. २५ जूनला सकाळी महिलांसाठी लावणी महोत्सव, तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तिसर्‍या दिवशी २६ जूनला महाराष्ट्राची ’लोककला’ आणि दुपारी ’मोगरा फुलला’ या पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होईल. यावेळी हास्य कलावंतांचे कलाविष्कार होईल.

Related Articles