मोशी जवळील कत्तलखाना बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश द्यावा : बंडातात्या कराडकर   

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोशी जवळील कत्तलखाना होणार नसल्याबद्दल भाष्य केले. परंतु, त्याचा अधिकृत लेखी आदेश येणे आवश्यक आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे कत्तलखान्याचा प्रश्न मांडला होता. त्यांनीही कत्तलखाना होणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, अधिकृत आदेश येण्यास चार महिने  लागले. त्याची पुनरावृत्ती कशावरून होणार नाही. सरकारवर आमचा विश्वास नाही; पण तत्काळ कार्यवाही करावी, अशी भूमिका ज्येष्ठ कीर्तकार बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी मांडली.
 
समस्य वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रातांध्यक्ष भगवान महाराज कोकरे, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट, श्री क्षेत्र देहू संस्थांचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष राम महाराज कदम उपस्थित होते.
 
कराडकर म्हणाले, वारकरी संप्रदाय सर्वात मोठा आहे. यावर्षी पावसाचे मोठे वातावरण आहे. मात्र, वारकर्‍यांचा उत्साह कमी झाला नाही. गर्दीचा फायदा घेऊन अनेक लोक खोट नाण चालविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही कोणत्या इतर संघटनेचा तिरस्कार करत नाही. मात्र, मुळावरच घाव घालत असाल तर सहन करणार नाही. 
 
चौधरी म्हणाले, घटना घडताना त्याला वाचा फोडण्याचे काम संबंधित मंत्र्याकडे केले आहे. प्रत्येक वेळी निवेदन देतो, पण असे किती वेळा करावे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात आश्वासन देऊन आठ महिन्यांचा कालवधी झाला. चंद्रभागा, तापी, गोदावरी हे जलस्रोत समाजातील सर्वांचेच उपयोगी आहेत. त्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. कत्तलखाना रद्द केल्याचा आदेश तात्काळ करण्यात यावा. या सर्व मागण्या आषाढी वारी पंढरपुरला पोहोचण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखी स्वरुपात आदेश देण्यात यावेत, असे झाले नाही तर वारकरी संप्रदाय अधिक उग्र स्वरुप धारण करेल.
 
नितीन महाराज मोरे म्हणाले, अनेक संघटना संस्था वारीत त्यांचा अजेंडा मांडत असतात. प्रबोधनाच्या नावाखाली गैरसमज पसरवले जात आहेत. ज्या पद्धतीने पाकीटमार दिसल्यावर अटक करता त्याच पद्धतीने संताबद्दल गैरसमज पसरविणार्‍या विरोधात कारवाई करावी. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले, सरकारला आळंदी, इंद्रायणीचे महत्त्व सांगणे हे भाग्य आहे. कत्तलखाना म्हणजे हे धर्मविरोधी मोठे षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. परंतु, त्यांना आश्वासन द्यावे लागतात. महापालिका आयुक्तांनी त्याबाबत तत्काळ लेखी आदेश काढावा.यावेळी पुण्यात स्वागत कक्ष आणि ध्वनीक्षेपक न लावण्याच्या आमच्या मागणीला पुणेकरांनी साथ दिली. पुण्यापर्यंत पालखी मार्गावर हे प्रमाण अतिशय कमी झाले. ज्या ठिकाणी ध्वनीक्षेपक सुरू होते. त्याठिकाणी वारकर्‍यांनी जाऊन सांगितल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Related Articles