‘शांघाय’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार   

किंगदाओ : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख टाळल्याबद्दल आणि पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाचा मुद्दा समाविष्ट न केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पण, त्याचवेळी भारताने पाकिस्तानची दहशतवादावरुन चांगलीच खरडपट्टी काढली.
 
चीनमधील किंगदाओ शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमोरच दहशतवादाबद्दल पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 
 
काही देश सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देत असून दहशतवाद्यांना थारा देत आहेत, असे राजनाथ यांनी यावेळी परखडपणे सांगितले. यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून हेही उपस्थित होते. 
 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांना प्राणास मुकावे लागले होते. धर्म आणि नाव विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, देशात संतापाची तीव्र लाट उसळली होती. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती.  
 

Related Articles