ऐक्याचा संदेश देणार्‍या अभिवादन दिंडीने वेधले भाविकांचे लक्ष   

पुणे : संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाना, भवानी पेठ परिसरात लोटलेल्या लाखो भाविकांचे लक्ष शनिवारी ऐक्याचा संदेश देणार्‍या अभिवादन दिंडीने वेधून घेतले. निवडुंगे विठोबा ते रिझवानी मस्जिद दरम्यानच्या या दिंडीची छायाचित्रे टिपण्यासाठी हजारो हात उंचावत होते. ’ज्ञानोबा तुकाराम’ चा जयघोष करणार्‍या वारकर्‍यांच्या सोबतीने वाटचाल करत मुस्लिम, बौध्द, शीख धर्मगुरूंनी मानवता हाच संतांनी सांगितलेला खरा धर्म आहे, असा संदेश दिला.
 
शिव महोत्सव समिती, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळाच्या व समविचारी संस्थांच्या वतीने सर्व धर्मिय अभिवादन दिंडीचे आयोजन केले होते. देहू वरुन तुकाराम महाराजांची पालखी निघते, त्यावेळी जवळच असलेल्या अंगरशा बाबा दर्ग्याजवळ हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत अभंग आरती केली जाते. दोघेही समकालीन व सहकारी आहेत. यावरुन प्रेरणा घेऊन ही अभिवादन दिंडी आयोजन करण्यात आले होते. भारतीय राज्यघटना आणि ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचे पूजन करून सर्वधर्मीय धर्म गुरू, आणि सर्व धर्मियांच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात झाली. 
 
दिंडीला उद्देशून मंडळाचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर म्हणाले, आमचे हिंदुत्व ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांचा राष्ट्रधर्म पाळणे हे आहे. हिच वारकरी धर्माची परंपरा आहे. आम्ही वारकरी रामराम पूर्वीपासून म्हणतो. पंढरपूर आणि रायगड ही आमच्या समता दिंडीची तीर्थस्थाने आहेत.यावेळी ग्यानी सूरजितसिंह, भंते सुदर्शन, शब्बीर काद्री अन्सारी आदी धर्मगुरुंसह सर्व धर्मिय नागरिक दिंडीत सहभागी होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार यांनी दिंडीचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस युवती शाखेच्या (शप) शिवानी माळवदकर यांनी संयोजन केले. उप आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, विठ्ठल गायकवाड, ’स्वामिनी सारीज’चे नावेद यांच्यासह नामवंत उपस्थित होते.

Related Articles