अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका   

इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष पेटला असतानाच इराणचे फोर्डो अणुऊर्जा केंद्र नष्ट करण्याच्या चर्चेला वेग आला आहे. इस्रायलने आधीच इराणच्या अनेक अणुऊर्जा केंद्रांना आणि प्रमुख लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे; परंतु इराणचा अत्यंत मजबूत भूमिगत युरेनियम समृद्धीकरण प्रकल्प फोर्डो अजूनही अबाधित आहे. अमेरिकेने बनवलेल्या ‘जीबीयू-५७’ या बंकर बस्टर बॉम्बने तो नष्ट होऊ शकतो. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लष्करी हस्तक्षेपाचा विचार करताना बंकर बस्टरच्या वापराची परवानगी देतील का? याबाबत साशंकता आहे. त्या पार्श्वभूमीवर बंकर बस्टर म्हणजे नेमके काय? ते जाणून घेऊ...
 
’बंकर बस्टर’ बॉम्ब म्हणजे काय? 
 
बंकर बस्टर बॉम्ब जमिनीखाली खोलवर असलेल्या शत्रूच्या बंकरवर मारा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा अणुबॉम्ब नाही; पण त्याची क्षमता अणुस्फोटाइतकीच प्रभावी मानली जाते. तो पृष्ठभागाच्या खाली २०० फुटांपर्यंत खाली जाऊन स्फोट घडवतो. अमेरिकेने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला या बॉम्बची रचना करण्यास सुरुवात केली आणि २००९ मध्ये बोइंगला २० युनिट्सची ऑर्डर दिली होती. 
 
वैशिष्ट्ये काय?
 
जीबीयू-५७ मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटरचे वजन जवळपास १३ हजार ६०० किलो आहे. या बॉम्बची लांबी २०.५ फूट आणि व्यास ३१.५ इंच आहे. त्यातील वॉरहेडमध्ये एफएक्स-७५७ आणि पीबीएक्सएन -११४ स्फोटकांचा समावेश आहे. त्याचे वजन जवळपास २ हजार ५०० किलो आहे. या बॉम्बचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील स्मार्ट फ्यूज. त्यामुळे बॉम्बचा लगेच स्फोट होत नाही. जमिनीत दोनशे फूट खोलवर गेल्यानंतरच बॉम्बचा फ्यूज सक्रिय होतो. मग बॉम्ब फुटतो. बॉम्बच्या भेदक क्षमतेबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. काहींनी म्हटले आहे की, हा बॉम्ब २०० फूट काँक्रीटला छेदू शकतो, तर काहींचे म्हणणे आहे की, बॉम्ब ६० मीटर काँक्रीट तसेच ४० मीटर खडकाळ भागाला छेदू शकतो.  
 
कसे तैनात केले जातात?
 
जीबीयू-५७ बॉम्ब वाहून नेण्यास आणि टाकण्यास सक्षम असलेले एकमेव विमान म्हणजे अमेरिकन बी-२ बॉम्बर. ते स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यापैकी काही बॉम्बर्स मे महिन्याच्या सुरुवातीला हिंद महासागरातील अमेरिकन-ब्रिटिश लष्करी तळ असलेल्या दिएगो गार्सिया येथे तैनात करण्यात आले होते. ते खूप लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. सैद्धांतिकदृष्ट्या पुरेशी क्षमता असलेले कोणतेही विमान ते करू शकते; परंतु या कार्यासाठी फक्त बी-२ ची रचना आणि चाचणी करण्यात आली आहे. 
 
बॉम्बची गरज का आहे?
 
इराण-इस्रायलमध्ये मागील नऊ दिवसांपासून युद्ध सुरू असून, इस्रायली सैन्याने इराणचे सैन्य आणि लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे क्षेपणास्त्रे, लाँचर, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी नियंत्रण केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तेहरानच्या दक्षिणेस असलेल्या फोर्डो युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पाला कोणतेही नुकसान झालेले नाही. फोर्डो प्रकल्प इतका भूमिगत आहे की, इस्रायली सैन्याला तो नष्ट करणे अशक्य होत आहे. फोर्डो पृष्ठभागापासून ८०-९० मीटर खाली आणि इस्रायली बॉम्बच्या आवाक्याबाहेर असल्याचे मानले जाते.
 
फोर्डोवर हल्ला शक्य आहे?
 
इराणचे फोर्डो हे अणुऊर्जा केंद्र एका पर्वताखाली जवळपास ८० मीटर खोलवर असून, ते अतिशय मजबूत संरक्षक संरचनेने झाकलेले आहे; पण एमओपी क्षमतेचा बॉम्ब त्यालाही उद्ध्वस्त करू शकतो. फोर्डोची खोली आणि संरक्षण पाहता, हे एकमेव शस्त्र आहे जे ते पूर्णपणे नष्ट करू शकते. फोर्डो समृद्ध युरेनियमचे उत्पादन करत आहे, त्यामुळे जीबीयू-५७ वापरून केलेल्या हल्ल्यात किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 
 
अमेरिकेची मदत आवश्यक 
 
इस्रायलकडे जीबीयू-५७ आणि ते तैनात करण्यासाठी बी-२ बॉम्बर विमाने नाहीत. फोर्डोला नुकसान पोहोचवण्यासाठी अणुहल्ल्याचा पर्याय किंवा उच्च-जोखीम असलेल्या ग्राउंड कमांडो हल्ल्याव्यतिरिक्त बंकर बस्टर हा सर्वोत्तम मार्ग आहे; पण यासाठी त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आवश्यक आहे. अमेरिकन बी-२ विमान दोन जीबीयू-५७ बॉम्ब वाहून नेऊ शकते. फोर्डो नष्ट करण्यासाठी अनेक बॉम्बची आवश्यकता असेल. ते फक्त एका बॉम्बने उडवता येणार नाही. अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येचियल लीटर यांनी हे आव्हान स्वीकारले. हे युद्ध फोर्डोच्या उच्चाटनाने संपले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  
धोरणात्मक इशारा की युद्धाची तयारी?
 
जरी आतापर्यंत या बॉम्बचा वापर युद्धात झालेला नसला तरी, अमेरिकेने केलेल्या त्याच्या चाचण्या आणि तयारी पाहता अमेरिका गरज पडल्यास तो वापरू शकतो. इराणविरुद्ध त्याचा वापर सध्या केवळ एक पर्याय म्हणून पाहिला जात आहे; परंतु या पर्यायाचे गांभीर्य दुर्लक्षित करता येणार नाही.

Related Articles