धरणे पन्नास टक्के भरली   

पुणेकरांना दिलासा; धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात कमी अधिक प्रमाणात पावसाचे सातत्य कायम आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखरेपर्यंत धरणे ५० टक्के भरली आहे. पुढील काही दिवस धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य कायम असणार असल्याचा अंदाज आहे. 
 
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत काल दिवसभर थांबून थांबून पाऊस पडत होता. खडकवासला धरण सर्वाधिक ६१.५१ टक्के भरले आहे. त्या पाठोपाठ वरसगाव धरण ५४.५० टक्के, पानशेत धरण ४६.५६, तर टेमघर धरण ३६.७३ टक्के भरले आहे. चार धरणात काल सायंकाळपर्यंत १४.५२ टीएमसी पाणी साठले आहे. धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे आज (मंगळवारी) सकाळपर्यंत धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली असणार आहेत. 
 
धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा एक हजार २६ क्युसेक पाणी कमी करून सकाळी ३४० क्युसेक पाणी सोडण्यात आले. यंदा राज्यात नियोजित वेळेच्या आधीच मान्सूनचे आगमन झाले. तसेच पावसालाही लवकर सुरुवात झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठ्यात लवकर वाढ होत आहे. नुकतीच पावसाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच महिन्यात धरणांत ५० टक्के पाणी साठले आहे. पावसाच्या सातत्यामुळे कोकणाच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगावर पडलेले पाणी मोठ्या प्रमाणात धरणात वाहून येत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पुढील काही दिवस धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य कायम असणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 
 
शहरात हलका पाऊस 
 
पुणे शहर आणि परिसरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा कायम होता. पावसाच्या सरीमुळे घरातून बाहेर पडणार्‍या नागरिकांना रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडावे लागले. सकाळी तसेच सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर पावसामुळे काही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पुढील चार दिवस शहरात ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 
धरण क्षेत्रातील पावसाची स्थिती 
 
धरण                  पाऊस        टीएमसी टक्केवारी
खडकवासला      ०२ मिमी            १.२१ ६१.५१
पानशेत             १६ मिमी          ४.९६ ४६.५६
वरसगाव            १८ मिमी           ६.९९ ५४.५०
टेमघर               २४ मिमी            १.३६ ३६.७३
एकूण                ६० मिमी            १४.५२ ४९.८१

Related Articles