गिलला एक छोटीशी चूक महागात पडणार   

हेडिंग्ले : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. कर्णधार शुबमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र तो वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे.गिल काळया रंगाचे मोजे घालून मैदानात उतरला. हे आयसीसीच्या ड्रेस कोडच्या नियमांच्या विरोधात आहे. गिलची ही चूक इंग्लंडच्या माध्यमांनी पकडली असून, आता गिलवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 
क्रिकेटचा सर्वात जुना प्रकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कसोटी क्रिकेटमध्ये आयसीनेने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागतं. कसोटी क्रिकेटमधील ड्रेस कोडच्या नियमानुसार, खेळाडूंना पांढरे, क्रीम रंगाचे किंवा हलके राखाडी रंगाचे मोजे परिधान करण्याची अनुमती दिली आहे. एमसीसीचा नियम १९.४५ नुसार, खेळाडूंना या ठरवून दिलेल्या तीन रंगांव्यतिरिक्त इतर कुठलेही गडद रंगाचे मोजे परिधान करण्याची अनुमती नाही. हा नियम २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत कुठल्याही खेळाडूने हा नियम मोडलेला नाही.
 
मैदानाच्या चारही बाजूंना कॅमेरे असतात. त्यामुळे छोटी मोठी कुठलीही गोष्ट कोणापासून लपून राहत नाही. गिल पाहिल्याच दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने घातलेले काळया रंगाचे मोजे हे कॅमेर्‍यात कैद झाले. स्काय स्पोर्ट्सने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. आता गिलची चूक सर्वांच्या लक्षात आली आहे. त्याच्यावरही आयसीसीकडून कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिची रिचर्डसन या सामन्याचे सामनाधिकारी आहेत. त्यामुळे ते याबाबत निर्णय घेतील. कसोटी क्रिकेटमध्ये ड्रेस कोडच्या नियमांच्या उल्लंघन करणं हा लेव्हल १ चा गुन्हा मानला जातो. त्यानुसार खेळाडूंना मॅच फीच्या १० ते १५ टक्के दंड आकारला जाऊ शकतो.

Related Articles