व्हॉट्सऍप कट्टा   

वारी

मनी पक्क ठरवलं 
यंदा वारीला जायचं
डोळे भरून एकदा
विठ्ठलास पहायचं 
 
खडीसाखर फुटाणे 
देवा तुळशीची माळ
पंढरीशी जोडायची 
अतुट भक्तीची नाळ
 
झिम्मा फुगड्या पावल्या 
खेळायच्या रिंगणात 
एकादशीला कहर 
विठोबाच्या अंगणात 
 
चंद्रभागे आसपास 
शोधायचे नामदेव 
कोरे पत्र सापडता 
दिसतील चांगदेव
 
जनाबाईंच्या जात्याला 
हुडकायचे कसून
बघू तरी मुक्ताईंच्या 
झोक्यावरती बसून 
 
गोरोबांच्या खापरांना
थेट लावीन मी भाळी
दाखवा ना कांदा मुळा
सांगेन सावता माळी
 
तुकोबांच्या विमानाला
स्पर्श हळूच करेन
शेणगोवर्‍या सखूच्या
हृदयापाशी धरेन
 
ब्रह्मशांती दुरूनच
एकनाथांची पाहीन
माउलींच्या भिंतीवर 
शुभ्र मोगरा वाहीन
 
लोटांगण चोखोबांना 
जोहार हो मायबाप
भागूबाईंच्या कृष्णाला
सांगायचे भवताप
 
शुद्ध जाईन वारीला
भाव ठेवून मनात 
एकमेव पांडुरंग 
असावा माझ्या ध्यानात 
 
- प्राची गडकरी, डोंबिवली (मो. ९९८७५६८७५०)
०००००००००
वाढदिवस साजरा करण्यात सध्या सर्वजण फार पुढे आहेत. खरेतर हा दिवस एक वर्षांनी वय वाढले म्हणून साजरा केला जातो. त्याचवेळी हा दिवस म्हणजे एक वर्षांनी आयुष्य कमी झालेला दिवस. वय वाढले आहे आणि आयुष्य कमी होत आहे तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी जन्मदिवशी वैद्यकीय तपासणी करून वाढत्या वयाला येणारे आजार होणार नाहीत, झालेच तर प्राथमिक स्वरूपात कळतील हे पाहिले पाहिजे. मेणबत्त्या  पेटवून त्या विझवण्यात काय महत्त्व आहे ते मला तरी कळले नाही! सिनेमात, सीरियलमध्ये नट-नट्या करतात, श्रीमंत, फॉरवर्ड, आधुनिक, लोक असेच साजरे करतात आणि आम्ही तसेच आहोत हे दाखवून दिले पाहिजे असे आहे का? हा मला पडलेला प्रश्न आहे. दुसरा प्रकार केक कापणे. कापणे हा शब्दच वाढदिवशी योग्य नाही. तिसरे जमलेल्या सर्व व्यक्तींनी हॅप्पी बर्थ डे टू यू असे ठरलेली चाल घेऊन म्हणणे. घरातली सर्वजण मिळून म्हणजे चारदोन लोक टाळ्या वाजवत हे म्हणतात. हे सगळे कुठून आणि कसे आले हे संशोधनाचा विषय आहे. पूर्वी वाढदिवशी नवीन कपडे घालून आपल्या देवघरात जाऊन देवाच्या पाया पडत होते. नंतर औक्षण सर्व ज्येष्ठ महिला करीत. घरात गोडधोड पदार्थ करीत. थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने जन्मदिवस साजरा होई. फरक लक्षात घ्यावा. कापणे, विझवणे हे वाईट, अपशकुन समजत. मुळात पैसै खिशात खुळखुळले की, हे सगळं सुचत असावं का? गरीब, दीन, आदिवासी, ग्रामीण भागातील आणि शहरातील हातावर पोट असणारे त्यांच्यासाठी ही चैन असणार. शाळेतली खिचडी मिळते म्हणून शाळा शिकणारी कोट्यवधी मुले या समाजात असताना हजारोंचे फुगे कसे फोडावेत याचे काहीच का वाटत नसेल. वाढदिवस साजरे करूच नयेत असेही माझे म्हणणे नाही. सत्कार्य करून, मदत करून, भुकेलेल्या लोकांना भोजन देऊन, गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय फी भरून वाढदिवस साजरा करता येईल. थंडीमुळे मरणारे हजारो आहेत. अर्धनग्न लोक खूप आहेत. त्यांना काही मदत करून वाढदिवस साजरा करता येऊ शकतो. या उपरही ज्यांना आपण आपल्या परीनं फक्त आपल्याच घरात, आपल्याच लोकात वाढदिवस साजरे करायचे आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
०००००००००

Related Articles