बोईंगचेच जास्त अपघात का?   

कॅप्टन भास्कर निघूट (हवाईदलातील निवृत्त अधिकारी)

अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच ‘एअर इंडिया’चे  एआय १७१ विमान कोसळले. प्राथमिक तपासात या विमानाचे  लँडिंग गियर बाहेर राहिले आणि उड्डाण करताना विंग फ्लॅप्स पूर्णपणे बंद असल्याचे उघड झाले आहे. जगात बोईंग विमानाचे अपघात का होतात आणि अहमदाबादच्या विमान अपघाताचे कारण याचा खोलात जाऊन शोध घ्यावा लागेल.
 
अहमदाबाद विमानतळावरून ‘एअर इंडिया’च्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणात ते कोसळले.  त्यात तीनशे जणांचा बळी गेला.असे का घडले असेल? सामान्यत: बोईंग ७८७ च्या नियमांनुसार उड्डाणासाठी विमानाच्या पंखांच्या झडपा( विंग फ्लॅप्स)फ्लॅप्स पाच किंवा त्याहून अधिक वर सेट करणे आवश्यक असते आणि जेव्हा विमान वेगाने उंची वाढवते, तेव्हा ते हळूहळू बंद केले जातात. उड्डाणानंतर काही सेकंदांनी लँडिंग गियर बंद केले जातात. त्यानंतरच विमान योग्यरीत्या उड्डाण सुरू करते.
 
 प्रसिद्ध झालेली छायाचित्रे व  व्हिडीओवरून असे दिसून येते, की पायलटने लँडिंग गियर थोडा बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु लगेचच तो पुन्हा बाहेर काढला. कदाचित त्याला वाटले असेल, की विमानाची शक्ती किंवा जोर कमी होत आहे. उड्डाणानंतर लगेचच विमानाची शक्ती गेली असण्याची शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे, की काही यांत्रिक किंवा हायड्रॉलिक बिघाडामुळे लँडिंग गियर खाली अडकला असेल. अशा परिस्थितीत, पायलटने हवेचा प्रतिकार कमी करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी फ्लॅप्स लवकर बंद केले असतील. कारण गियर आणि फ्लॅप्स दोन्ही बाहेर पडल्याने हवेचा खूप प्रतिकार होतो. त्यामुळे विमानाला उंच जाणे कठीण होते; परंतु कमी उंचीवर आणि कमी वेगाने फ्लॅप्स लवकर बंद करणे खूप धोकादायक आहे. कारण ते विमान उचलणारी शक्ती (लिफ्ट) कमी करते आणि विमान थांबण्याचा धोका वाढवते. विमान जास्त हललेले दिसत नव्हते, याचा अर्थ वैमानिकांचे नियंत्रण होते. उजवा रडार वापरला गेला होता. त्यामुळे डाव्या इंजिनमध्ये बिघाड झालेला असू शकतो, असेही सांगितले गेले;परंतु त्यामुळे विमान कोसळण्याचे कारण स्पष्ट होत नाही. ६०० फूट उंचीवर गियर आणि फ्लॅप्स बंद करणे हे खूप चुकीचे आहे. हे कदाचित तांत्रिक बिघाडांमुळे किंवा वैमानिकांच्या आपत्कालीन प्रयत्नांमुळे घडले असेल. अखेर, विमानाची उंची कमी झाली आणि ते थांबले. कारण उंचीवर जाण्याचा वेग (लिफ्ट) कमी होता आणि हवेचा प्रतिकार जास्त होता. यामुळे,वैमानिक विमान वाचवू शकले नाहीत.या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला आहे. त्याच्या तपासणीतून नेमके काय घडले हे उघड होईलच,पण त्याला वेळ लागेल.
 
बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अपघातात एवढ्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान २०११ पासून व्यावसायिक सेवांमध्ये आहे आणि आजपर्यंत सर्वात सुरक्षित विमानांमध्ये त्याची गणना केली जाते. ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये दोन केशरी रंगाची उपकरणे असतात. पहिले म्हणजे ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ (एफडीआर). ते विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटने केलेल्या प्रत्येक तांत्रिक कृतीची नोंद करते. दुसरे म्हणजे ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ (सीव्हीआर). ते वैमानिकांचे संभाषण, कंट्रोल टॉवरशी रेडिओ संपर्क आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड करते. 
 
बोईंग विमान कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही बोईंग विमाने अनेक वेळा कोसळली आहेत. २०२४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोईंगचे एक विमान कोसळले होते. त्यात सुमारे १८० जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बोईंगचे ७३७-८०० विमान होते. ते आता  ७३७ मॅक्सची नवीन आवृत्ती आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, एका वेगळ्या घटनेत, उड्डाणादरम्यान ७३७ मॅक्सच्या दरवाजाचा प्लग उडाला. याशिवाय, २०१८ आणि २०१९ मध्ये बोईंग ७३७ मॅक्स विमानेदेखील कोसळली.  त्यामुळे विमानांचे उत्पादन थांबवावे लागले आणि कंपनीला ३० अब्ज डॉलर्सपर्यंतचे नुकसान झाले. २०१८ आणि २०१९ च्या अपघातांमध्ये १८९ आणि १५७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तथापि, अजूनही बोईंग ७३७-८०० सह वापरात  आहे.  जेव्हा बोईंग विमाने सतत अपघातग्रस्त  होत होती, तेव्हा बोईंग ७३७ मॅक्सची चौकशी करण्यात आली. तपासणीत ‘मॅन्युव्हरिंग कॅरेक्टरिक्स ऑगमेंटेशन सिस्टम’ (एमसीएएस) शी संबंधित समस्या उघडकीस आली. या प्रणालीमुळे मॅन्युअल लँडिंगवरील अवलंबित्व कमी झाले होते; परंतु वैमानिकांना त्याबद्दल फारशी माहिती देण्यात आली नव्हती. २०१८ आणि २०१९ मध्ये ३४६ प्रवासी आणि क्रू सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले.
 
या अपघातानंतर, या विमानाचा वापर  थांबवण्यात आला . नंतर त्याअत सुधारणा करून बोईंग ७३७-८०० या नावाने कार्यान्वित करण्यात आले. बोईंगच्या ७८७ ड्रीमलाइनरला यापूर्वी कधीही अपघात झाला नव्हता.  या अपघातामुळे पुन्हा ७८७ च्या सुरक्षिततेबद्दल  प्रश्न निर्माण झाले आहेत. या विमानाबद्दल वर्षानुवर्षे इशारे दिले जात होते. ७८७ च्या ‘फ्यूजलेज’चे काही भाग योग्यरित्या जोडले गेले नव्हते. त्यामुळे विमानाच्या संरचनेला धोका निर्माण झाला होता. बोईंग पार्टनर सुविधेतील तंत्रज्ञ रिचर्ड क्युवास यांनी २०२३ मध्ये ‘निकृष्ट उत्पादन’ झाल्याचे म्हटल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एफएए) या दाव्यांची चौकशी करत आहे. ‘बोईंग’ने जाणूनबुजून सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा इन्कार केला. ७८७ सुरक्षित असल्याचे सांगितले आणि टिकाऊपणा किंवा दीर्घायुष्याला कोणताही तात्काळ धोका नसल्याचे म्हटले. तथापि, आता या मोठ्या अपघातानंतर, बोईंग पुन्हा एकदा चौकशीच्या कक्षेत आले आहे.
 
आकडेवारीनुसार, बोईंग विमानांचे जगभरात सुमारे सहा हजार अपघात  घडले आहेत. त्यापैकी ४१५ प्राणघातक होते. अपघातात नऊ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. जगभरात उड्डाण करणार्‍या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान चार हजारांहून अधिक विमाने बोईंग ७३७-८०० वर्गातील आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार  आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या भागांत  बोईंग विमाने वापरली जातात. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. त्यात २९७ जणांचा बळी गेला. हा अपघात गेल्या दशकातील जगातील सर्वात मोठा विमान अपघात ठरला आहे.
 
अमेरिकन संघटना ‘नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड’ (एनटीएसबी) नुसार, ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये २५ तासांपर्यंतच्या सतत उड्डाणाची माहिती रेकॉर्ड केली जाते. अहमदाबाद अपघातात ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल. त्यातून अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड, इंजिनमध्ये बिघाड, पायलटची चूक किंवा इतर काही कारण होते की नाही हे कळेल. तज्ज्ञांच्या मते, ‘टेकऑफ’नंतर लगेच उंची वाढवणे आणि आपत्कालीन कॉल पाठवणे अशा परिस्थितीत, इंजिनच्या कामगिरीची आणि इशारा सिग्नलची माहिती ‘एफडीआर’कडून उपलब्ध होईल, तर ‘सीव्हीआर’ त्या क्षणी वैमानिकांनी केलेले प्रयत्न आणि संवाद उघड करेल.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएक्यू) नियमांनुसार, प्राथमिक अहवाल तीस दिवसांच्या आत जारी करावा लागतो; परंतु संपूर्ण अहवाल तयार होण्यास १२ते २४ महिने लागू शकतात. ‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ नुसार, आधुनिक विमाने दर सेकंदाला हजारो डेटा पॉइंट्स तयार करतात. त्यांचे विश्लेषण अतिशय बारकाईने करावे लागते. बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचा हा पहिला मोठा अपघात असल्याने, त्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

Related Articles