चिराग यांचे दबावाचे राजकारण?   

राज्यरंग ,शिवशरण यादव 

केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बळकट करण्यासाठी बिहार विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे ठरवल्याचे म्हटले आहे. बंड करायचे आणि आघाडीही बळकट करायची, हे ते कसे साधणार? यामागे चिराग यांचा नितीशकुमार यांच्या पक्षाचे खच्चीकरण करण्याचा हेतू आहे का, असा प्रश्न पडतो.
 
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार आणि रामविलास पासवान हे समाजवादी राजकारणाचे तीन चेहरे होते लालू आणि नितीश हे दोघे बिहारचे मुख्यमंत्री झाले; रामविलास पासवान केंद्रीय राजकारणात राहिले. फेब्रुवारी २००५ च्या निवडणुकीतील निकालानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि नितीशकुमार या दोघांनीही रामविलास यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितले होते; परंतु त्यांना केंद्रीय राजकारणात रस होता. याउलट, त्यांचे चिरंजीव चिराग यांना बिहारमध्ये राजकारण करायचे आहे. केवळ राज्याचे राजकारण करायचे नाही, तर बिहारचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. बिहारच्या राजकारणात सध्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हेच एकमेव तरुण चेहरा आहेत. राष्ट्रीय आघाडीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असला, तरी त्या पक्षाकडे कोणताही तरुण चेहरा नाही. भाजपने नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात अनेक उपमुख्यमंत्री केले, मंत्री केले; परंतु ते नितीशकुमार यांना पर्याय होण्याऐवजी सावली बनून राहिले. चिराग यांच्याकडे वय आहे. तेजस्वी यांना ते पर्याय ठरू शकतात. अशा परिस्थितीत भाजपकडून चिराग पासवान यांच्यावर त्यांचा लोकजनशक्ती पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी दबाव आणला जात आहे; परंतु चिराग यांची त्याला तयारी नाही. अर्थात भाजप हा आरोप नाकारतो. रामविलास पासवान यांच्या काळात पक्ष यापेक्षा खूप मजबूत होता, तरीही ते मुख्यमंत्री झाले नाहीत. चिराग यांना अजूनही दलितांमध्ये रामविलास पासवान किंवा मायावतींइतकी स्वीकृती नाही. बिहारची तुलना झारखंड किंवा ईशान्येतील लहान राज्यांशी करता येणार नाही. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी स्वबळावर १३७ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी फक्त राजकुमार सिंह यांनी मटिहानीची जागा जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर राजकुमार सिंह संयुक्त जनता दलात दाखल झाले. २०२० च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि भाजपनंतर संयुक्त जनता दल हा तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला. संयुक्त जनता दलाला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावे लागले. लोकजनशक्ती पक्षाचे ३५ उमेदवार संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांच्या विजयात अडथळा ठरले. तथापि, आता लोकजनशक्ती पक्षाने संयुक्त जनता दलाशी आपले संबंध सुधारले केले आहेत. 
 
अलिकडेच नितीश सरकारने लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस धनंजय मृणाल पासवान यांना अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनवले आहे. धनंजय हे चिराग यांचे मेहुणे आहेत. रामविलास यांना हवामानशास्त्रज्ञ म्हटले जात असे. चिराग त्यांच्यापेक्षा पुढे आहेत. त्यांना संबंध कसे सांभाळायचे  हे माहीत आहे. चिराग यांचा वापर भाजपने मागच्या वेळी केला. त्यांना आता बिहारमध्ये मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले आहेत; परंतु थोडीशी राजकीय जाणीव असलेले लोकही त्यांना दलितांचा नेता मानत नाहीत, कारण त्यांना दलितांच्या प्रश्नांची काळजी नाही. त्यांच्या संपूर्ण राजकारणात चित्रपटांसारखे ग्लॅमर जाणवते. प्रत्येक पित्याला आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण करावे असे वाटते. चिरागदेखील अनेकदा वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याबद्दल बोलतात; परंतु त्यांच्या राजकीय हवामानशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती बरीच मोठी आहे. ते सध्याच्या शर्यतीत वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चिराग पासवान कोणत्याही प्रकारच्या सामाजिक समीकरणांच्या जुळवणीवर स्वतंत्रपणे काम करताना दिसत नाहीत; परंतु त्यांनी युतीचे राजकारण चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सुरुवात केली आहे. खरे तर, भाजपसोबत युती करण्याचा विचार चिराग यांचा होता. कारण, त्यापूर्वी ते काँग्रेससोबत होते. धर्मनिरपेक्ष राजकारण त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होते. एकदा त्यांनी बिहारमध्ये मुस्लिम उमेदवाराच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरही जोर दिला होता. ही २००५ ची गोष्ट आहे. त्या काळात लालू यादव यांच्या ‘एम-वाय’ फॅक्टर राजकारणावर हा अचूक उतारा ठरु शकणार होता. रामविलास निश्चितच त्यांच्या समुदायाचे राजकारण करायचे; परंतु ते जातीच्या राजकारणाबाहेरही आपली उपस्थिती जाणवू द्यायचे. चिरागदेखील तेच करत आहेत. म्हणूनच बिहारमध्ये बदलाची लाट आणण्याचा प्रयत्न करणारे प्रशांत किशोरदेखील त्यांचे कौतुक करत आहेत.
 
केंद्रीय मंत्री असूनही चिराग आता बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे चिराग कोणत्याही राखीव जागेवरून नाही, तर खुल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जोरदार संकेत देत आहेत. भाजप बर्‍याच काळापासून नितीशकुमार यांना पर्याय शोधत आहे. बिहार भाजपच्या नेत्यांमध्येही असा शोध घेण्यात आला ; परंतु  फक्त सम्राट चौधरीच सापडले; मात्र त्यांचे महत्त्वदेखील नितीशकुमार यांच्या राजकीय समीकरणातील लव-कुश श्रेणीतून आले आहे. वाढत्या वयामुळे नितीशकुमार यांना बर्‍याच मर्यादा आल्या आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे; परंतु आता फक्त अनुभव कामी येणार नाही. अनेक प्रसंगी नितीशकुमार अशा पद्धतीने वागले आहेत की ही शंका आणखी गहिरी होते. चिराग पासवान तेजस्वी यादव यांच्या वयाचे आहेत. ते फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन्ही प्रकारात बसतात. आणि ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’सारख्या मोहिमेमुळे त्यांना  लोकप्रियता मिळत आहे. सध्या तेजस्वी यादव यांच्या लोकप्रियतेच्या प्रमाणात चिराग खूप मागे आहेत; ‘इंडिया टुडे सी व्होटर’ पाहणीत तेजस्वी यादव यांची लोकप्रियता ३६.९ टक्के इतकी असल्याचे दिसलेे, तर फक्त १०.६ टक्के लोक चिराग यांना मुख्यमंत्रिपदासाठी आवडता चेहरा मानतात. आज नितीशकुमार यांची लोकप्रियता  १८.४ टक्के आहे.तेजस्वी यादव यांच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे ते २०२० पासून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, तर चिराग हे फक्त अटकळींचा भाग बनले आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांमध्ये होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच फूट पडली आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सूचनेनुसार घेतला गेला आहे की त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. निवडणुकीत चिराग पासवान बिहारमध्ये ‘एनडीए’चा विस्तार करत आहेत की दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा लवकरच उलगडा होईल, मात्र बिहारच्या राजकारणात असलेली तरुण नेतृत्वाची पोकळी त्यांच्यासारखे तरुण भरुन काढू शकतात. लोकांच्या मान्यतेच्या पातळीवर त्यांना करण्यासारखे बरेच काही असले तरी अद्याप मोठे अंतर कापायचे आहे. बिहारच्या राजकारणाला बरेच कंगोरे आहेत. नितिशकुमार यांच्या जागी समर्थ नेता आणणे ही आता काळाची गरज आहे. या अनुषंगाने ही लढाई चिराग कशी लढतात आणि भाजपच्या कवेत राहतानाच तेजस्वी यादव यांच्या बरोबरीने लोकमत आपल्या बाजूने कसे वळवतात, हे आता पहावे लागणार आहे.  

Related Articles