घरात घुसून तरूणीवर अत्याचार   

कोंढव्यातील घटना; कुरिअर बॉय असल्याचा बनाव

पुणे : कुरिअर बॉय असल्याची बतावणी करत तरूणीला सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले, त्यानंतर जबरदस्तीने घरात प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने जाताना पीडितेच्या मोबाइलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईन, असा मेसेज लिहिला. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
 
परवा सायंकाळी कुरिअर बॉय असल्याचे भासवून आरोपी एका सोसायटीमध्ये शिरला. त्यानंतर, पीडितेच्या घरी गेला आणि तिला कुरिअर घेण्यास सांगितले. त्यावेळी पीडितेने हे कुरिअर माझे नसल्याचे त्याला सांगितले. तरीदेखील तुम्हाला स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे पीडितेने सेफ्टी डोअर उघडले. त्याचाच फायदा घेऊऩ आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने तिच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह सेल्फी काढला. त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून परत येईल, असा मेसेज लिहिला.   
 
या प्रकारामुळे पीडिता बेशुद्ध पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडिता तिच्या भावासोबत या सदनिकेमध्ये राहते. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची दहा पथके रवाना केली आहेत. न्याय वैद्यकशास्त्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पुरावे गोळा केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आरोपीने कोणता स्प्रे वापरला होता, हे स्पष्ट होईल. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
 

Related Articles