गुप्तहेरांच्या विश्वातला लेखक   

भालचंद्र गुजर 

आंतरराष्ट्रीय हेरगिरीच्या कथानकांवर आधारित थरारक पुस्तकांच्या लिखाणाबद्दल फ्रेडरिक फोर्सिथ जग विख्यात होते. त्यांच्या कादंबर्‍यांनी वाचकांना वेगळ्या जगाचा परिचय करून दिला. .फोर्सिथ यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या लेखनकार्याचा परिचय..

ज्यांची पुस्तके पहिल्या वाक्यापासून अखेरच्या वाक्याच्या पूर्णविरामापर्यंत क्षणभरही हातातून खाली ठेवावीशी वाटत नाहीत, अशा वाचकप्रिय लेखकांच्या नामावलीत प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार फ्रेडरिक फोर्सिथ याचा क्रम बराच वरचा. त्याच्या ‘द डे ऑफ जॅकल’, ‘द डॉग्ज ऑफ वॉर’, ‘द ओडेसा फाईल’, ‘द निगोशिएटर’, ‘द फिस्ट ऑफ गॉड’, ‘द अफगाण’, ‘द कोब्रा’, ‘द डिसिव्हर’, ‘द फोर्थ प्रोटोकॉल’, ‘फॉक्स’ या काही अतिशय गाजलेल्या कादंबर्‍या. आजमितीला त्याच्या कादंबर्‍यांच्या सात कोटींहून अधिक प्रती खपल्या असून, जगातील विविध भाषांतून त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या वाचकप्रियतेचे कारण म्हणजे फोर्सिथच्या कादंबर्‍या केवळ हेरगिरीचे वर्णन करणार्‍या चातुर्यकथा नव्हत्या, तर त्यातून आंतरराष्ट्रीय राजकारण, कटकारस्थाने, नवी संहारतंत्रे आणि दहशतावदाची बदलती समीकरणे यांचे वस्तुनिष्ठ चित्रण वाचकप्रत्ययास येत होते.
 
फेडरिक फोर्सिथचे आठ दशकांहून अधिक काळ विस्तारलेले आयुष्य ही एक संघर्षयात्रा होती. २५ ऑगस्ट १९३८ रोजी इंग्लंडच्या केंट परगण्यातील अ‍ॅशफर्ड येथे जन्मलेल्या फोर्सिथचे बालपण दुसर्‍या महायुद्धाच्या सावलीत गेले. टोनब्रीज स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो स्पेनमधील ग्रॅनाडा विद्यापीठात दाखल झाला. फोर्सिथ शालेय शिक्षणात तसा जेमतेमच होता; पण त्याला विविध भाषा शिकण्याची आवड होती. मातृभाषा इंग्रजीशिवाय फ्रेंच, रशियन, जर्मन व स्पॅनिश भाषा चांगल्याप्रकारे अवगत  होत्या. त्याचा उपयोग त्याला नंतरच्या काळात पत्रकारिता व हेरगिरी करण्यासाठी झाला. आणखी म्हणजे, फोर्सिथला जगप्रवासाची गोडी होती. त्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तो ‘रॉयल एअरफोर्स’ मध्ये वैमानिक बनला. दोन वर्षांनी ही नोकरी सोडल्यावर फोर्सिथ ‘रॉयटर्स’ या प्रख्यात वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून कामाला लागला आणि १९६५ मध्ये ‘बीबीसी’चा वार्ताहरही झाला.
 
‘दि बायफ्रा स्टोरी’(१९६९) या फोर्सिथच्या पहिल्या पुस्तकातून त्याची शोधपत्रकारिता प्रकटली आहे. त्यात १९६० च्या दशकातील नायजेरियामधील यादवी युद्धाचा वृत्तांत आला आहे. या पुस्तकात रक्तपाती हिंसाचाराची वास्तव वर्णने तर आहेतच; पण ब्रिटिश सरकारच्या अनैतिक राजकारणावर जळजळीत टीकाही आहे. ब्रिटनला नायजेरियन सरकारवरील आपला प्रभाव वापरून तेथे शांतता प्रस्थापित करणे सहज शक्य होते; पण तत्कालीन राज्यकर्त्यांच्या भेकडपणामुळे तसे  होऊ शकले नाही. परिणामी तेथे फार मोठी जीवितहानी झाली आणि ब्रिटनची राजकीय प्रतिमा मलीन झाली, असे फोर्सिथने या पुस्तकात स्पष्टपणे सांगितले होते, तसेच ‘बीबीसी’च्या सरकारधार्जिण्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
 
फोर्सिथची पत्रकारितेतील कारकीर्द त्याचे अनुभूतिविश्व समृद्ध करून गेली. त्याने फ्रान्स, चेकोस्लोव्हाकिया आणि पूर्व जर्मनीत बातमीदारी केली. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील शीतयुद्धाचा तो काळ. आरंभी तीन वर्षे इंग्लंडमध्ये पत्रकारिता केल्यावर ‘रॉयटर्स’चा प्रतिनिधी म्हणून फोर्सिथ पॅरिसला गेला, तेव्हा तेथील परिस्थिती अतिशय स्फोटक होती. पॅरिसच्या रस्त्यांवर डाव्या आणि उजव्या  विचारसरणीच्या समर्थकांमध्ये हिंसक चकमकी होत असत. सोव्हिएत युनियनशी एकनिष्ठ असलेल्या कम्युनिस्ट पार्टीचा तेथे प्रभाव होता. ‘ओएएस’ या उजव्या फुटीर गटाकडून फ्रेंच अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले होते. अशा परिस्थितीत अध्यक्षाच्या हत्येसाठी फ्रेंच पोलीस ज्याला ओळखत नाहीत अशा भाडोत्री मारेकर्‍याला बाहेरून  आणण्याखेरीज ‘ओएएस’ला अन्य पर्याय नाही, असे फोर्सिथला वाटत होते. त्याने या विषयावर कादंबरी लिहिण्याचे ठरवले आणि लंडनमधील आपल्या एका मित्राच्या सदनिकेत बसून ती कादंबरी अवघ्या ३५ दिवसांत पूर्ण केली. ‘जॅकल’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा आणि फ्रान्सच्या अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न या वस्तुस्थितीवर आधारित ती ‘द डे ऑफ द जॅकल’ ही कादंबरी होती. १९७१ मध्ये ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वर्षभरात तिच्या सुमारे १० लाख प्रती खपल्या.
 
‘द ओडेसा फाईल’(१९७२) ही फ्रेडरिक फोर्सिथची दुसरी कादंबरी. पीटर मिलर हा तरुण जर्मन पत्रकार दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील रिगा या ज्यूंच्या छळछावणीच्या प्रमुख अधिकार्‍याला दोन दशकांनंतर कसा शोधून काढतो, याची थरारक कथा गतिमान शैलीने या कादंबरीत सांगितली गेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर ‘एस एस’ या कुप्रसिद्ध नाझी संघटनचे सदस्य जर्मनी सोडून इतर देशांत पळून गेले होते आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यातील बहुतेकांनी आपली नावे बदलून नवे आयुष्य सुरू केले. या सदस्यांना मदत करणार्‍या संघटनेचे ‘ओडेसा’ हे नाव. कादंबरीचे कथानक काल्पनिक वाटत असले, तरी त्याला ऐतिहासिक वास्तवाचा आधार आहे.
 
फ्रेडरिक फोर्सिथने आपल्या लेखनकारकीर्दीत मुख्यत्वे गुप्तहेर  कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यात एकसुरीपणा वा आशयाची पुनरूक्ती आढळत नाही. विषयांचे वैविध्य हे त्याच्या कादंबर्‍यांचे प्रथमदर्शनीच जाणवणारे वैशिष्ट्य. त्याच्या एका कादंबरीत जैविक युद्धाचे तपशील येतात आणि दुसर्‍या कादंबरीत शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व सोव्हिएत युनियन एकमेकांच्या शेतातील पिके कशी संपवतात याची कथा येते. त्याच्या ‘आयकॉन’ला १९९९ मधील भ्रष्टाचार व दहशतवाद यामुळे विघटन होत असलेल्या रशियाची पार्श्वभूमी आहे, तर ‘द कोब्रा’मध्ये  अमली पदार्थांची निर्मिती व व्यापार करणार्‍यांचे जग साकार होते. तेल कंपन्या व शस्त्रास्त्रांचे व्यापारी यांचा राजकारण्यांशी होणारा संघर्ष हा ‘द निगोशिएटर’चा विषय आहे, तर ‘द किल लिस्ट’मध्ये धर्मांध दहशतवादाचे भयावह रूप स्पष्ट होते.
 
आरंभकाळात मुख्यत्वे शीतयुद्ध व युरोप यांवर लेखन करणार्‍या फोर्सिथने नंतर आपल्या कथानकाचा भौगोलिक परिसर कोलंबियापासून थेट पाकिस्तानपर्यंत विस्तारला. शिवाय शीतयुद्धाच्या काळातील शत्रूची जागा अमली पदार्थांचे धनाढ्य व्यापारी आणि ‘अल कायदा’ सारख्या धर्माधिष्ठित संघटनांनी घेतली. फोर्सिथची ‘द डॉग्ज ऑफ वॉर’(१९७४) ही एका ब्रिटिश करखानदाराने भाडोत्री सैनिकांच्या मदतीने आफ्रिकेतील झांगारो या काल्पनिक देशाचे सरकार पदच्युत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कहाणी आहे. बायफ्रा आणि नायजेरियाच्या यादवी युद्धाच्या काळात त्याने केलेल्या पत्रकारितेचा अनुभव येथे संक्रमित झाला आहे. आपल्या लेखनातील तपशिलाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी फोर्सिथ संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करीत असे आणि कथानकाच्या आवश्यकतेनुसार एखादा माजी नाझी अधिकारी, तुरुंगातून सुटलेला धंदेवाईक मारेकरी, रशियन पॉलिट ब्युरोचा निवृत्त अधिकारी, अध्यक्षांचा शरीररक्षक तसेच सीआयए व एसएसआयच्या अनुभवी गुप्तहेरांच्या भेटी घेत असे. त्यामुळेच तर साहस, डावपेच, हेरगिरी, प्रतिहेरगिरी, अनिष्ट शस्त्रास्त्र स्पर्धा अशा  जीवघेण्या परिस्थितीचे वास्तव वर्णन करणार्‍या त्याच्या कादंबर्‍या वाचकांना वेगळ्याच विश्वात नेतात. या संदर्भात फोर्सिथने खुलासा केला होता - ‘मी ‘एमआय-सिक्स’ या ब्रिटनच्या सरकारी गुप्तहेर संघटनेसाठी वीस वर्षे काम केले, तेही विनामूल्य.‘
 
फ्रेडरिक फोर्सिथ हा सर्वार्थाने यशस्वी लेखक होता. ‘द फँटम ऑफ मॅनहटन’चा अपवाद वगळता त्याच्या उर्वरित कादंबर्‍यांना वाचकप्रियता लाभली आणि कथासंग्रहही बर्‍यापैकी यशस्वी ठरले. त्याच्या कथा-कादंबर्‍यांवर चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती झाली. ‘आऊटसायडर ः माय लाइफ इन इंट्रिग’(२०१५) हे फोर्सिथचे आत्मचरित्रही त्याच्या कादंबर्‍यांप्रमाणेच थरारक होते. त्यानंतर त्यांची ‘द फॉक्स’(२०१८) ही कादंबरी आली. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो लेखनमग्न होता. ९ जून २०२५ रोजी फोर्सिथ याचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले, तरी आपल्या कादंबर्‍यांमुळे तो दीर्घकाळ वाचक स्मरणात राहीलच! आणखी एक म्हणजे, टोनी केंट या सहलेखकाच्या मदतीने लिहिलेली फोर्सिथची ‘रिव्हेंज ऑफ ऑफ ओडेसा’ ही नवी कोरी कादंबरी या वर्षाअखेर वाचकभेटीला येत आहे.

Related Articles