‘चोकर्स’ची विजयी भरारी   

मडविकेट , कौस्तुभ चाटे 

दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेट या दोन गोष्टींचा विचार केला की पहिला शब्द मनात येतो तो म्हणजे ’चोकर्स’. गेली अनेक वर्षे या संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये उत्तम खेळ केला आहे. १९९१-९२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने  अनेक उत्तम खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. त्यानी अनेक द्विपक्षीय मालिका, आयसीसी स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. काही उत्तम कर्णधार, अष्टपैलू खेळाडू आणि विशेषतः वेगवान गोलंदाज या संघाकडून खेळले आहेत.
 
पण इतकं सगळं असून देखील या कालावधीत ते केवळ एकदा ‘आयसीसी’ आयोजित स्पर्धा  जिंकण्यात यशस्वी झाले होते, या गोष्टीला देखील आज २७ वर्षे होऊन गेली. या मोठ्या कालावधीत अनेक महत्त्वाच्या प्रसंगी, निर्णायक सामन्यांमध्ये हार पत्करण्याची दक्षिण आफ्रिका संघाची खोड सर्वांनाच माहित आहे. कधी धावांच्या चुकीच्या गणतीमुळे, कधी एखाद्या छोट्या संघाकडून पराभव पत्करल्यामुळे तर कधी आणखी काही कारणाने दक्षिण आफ्रिका संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायमच ’चोकर्स ’ठरला. पण मागच्या आठवड्यात झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार विजेते म्हणून आज ते मिरवत आहेत. अनेक वर्षे बाळगत असलेला ’चोकर्स’चा टॅग भिरकावून देऊन त्यांनी भरारी घेतली आहे. 
 
२०२३-२५ या कालावधीत खेळली जाणारी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकेल असा विचार कोणीही केला नव्हता.त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला तेव्हाच क्रिकेट पंडितांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाचा, ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आज पाच फूट पाच इंचाच्या जवळपास उंची असलेला, एखाद्या क्रिकेटपटूपेक्षा  बेढब वाटणारा, अनेकदा समाज माध्यमांवर ‘मीम’चे कारण बनलेला, कृष्णवर्णीय टेम्बा बवूमा हा कर्णधार आज केवळ अफ़्रिकेच्याच नाही तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाने मिळवलेला विजय त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षण ठरावा. लॉर्ड्सवर झालेल्या या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियन संघाला ५ गडी राखून हरवले आणि हे विजेतेपद मिळवले. 
 
या सामन्यापुरते बोलायचे झाले तर या विजयाचे श्रेय दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (सामन्यात ९ बळी), मार्को यान्सेन (सामन्यात ४ बळी) आणि लुंगी इंगिडी (सामन्यात ३ बळी) तसेच फलंदाज एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बवूमा यांना द्यावे लागेल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात इंग्लंडच्या लहरी हवामानाने देखील मोठी भूमिका पार पाडली. सामन्याचे पहिले दोन दिवस गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व गाजवले, तर पुढील दीड दिवस फलंदाजांचे राज्य होते. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आणि पहिल्या दोन सत्रांतच त्यांचा संघ २१२ च्या धावसंख्येवर बाद झाला. रबाडा आणि यान्सेन या दोन वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाला डोके वर काढूच दिले नाही. स्टीव्ह स्मिथ आणि नवोदित ब्यू वेब्स्टर या दोघांनी बरा खेळ केला अन्यथा त्यांची परिस्थिती अजूनच विदारक झाली असती. अर्थात नंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी देखील आफ्रिकेची परिस्थिती बिकट केली होती. दक्षिण आफ्रिकेला १३८ वर बाद करून त्यांनी भरभक्कम ७४ धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात देखील परत एकदा रबाडाने उत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ फलंदाज बाद केले. दुसर्‍या डावात देखील ऑस्ट्रेलियन संघाने २०० धावांचा टप्पा जेमतेम पार केला. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी सामन्याच्या चौथ्या डावात २८२ धावांचे आव्हान होते. त्यावेळी देखील ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होते, पण सामन्याच्या तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकन संघाने, खास करून मार्करम आणि बवूमाने टिच्चून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 
 
एडन मार्करम चे वर्णन करायचे झाले तर ’सायलंट किलर’ असे करता येईल. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये, विविध लीग्समध्ये त्याने आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवली आहे. थंड डोक्याने फलंदाजी करणे हा त्याचा स्थायीभाव. या सामन्यात देखील, मोठे आव्हान असताना तो शांत डोक्याने खेळत राहिला. मागच्याच वर्षी त्याने आपल्या संघाला आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले होते. दुर्दैवाने त्यांना हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला होता. त्याच मार्करमने आफ्रिकेला विजय मिळवून देणे, या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणे ही नियतीचीच योजना असावी. 
 
टेम्बा बवूमा बद्दल तर खूप काही लिहिता येईल. टेम्बा म्हणजे होप - आशा. याच टेम्बा बवूमाला अनेकदा त्याच्या रंग रुपावरुन झिडकारले गेले, तर बरेचदा त्याची थट्टा देखील केली गेली. पण आज बवूमाने दक्षिण आफ्रिकेला स्वप्नातील विजय मिळवून दिला आहे. जी गोष्ट ग्रॅहम स्मिथ, जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, फाफ डू प्लेसी, क्विंटन डी कॉक सारख्या दिग्गजांना नाही जमली ती या पट्य पट्ठ्याने  करून दाखवली.रंग, उंची आणि दिसण्यावरून ज्याची थट्टा केली गेली त्याच टेम्बाने प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियन संघाला जेरीस आणणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.
 
आफ्रिकेच्या या विजयानंतर मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये काम केलेल्या काही मित्रांशी बोललो. अनेकांना त्यांच्या भावना व्यक्त करताना अश्रूंचा आधार घ्यावा लागत होता. आफ्रिकन क्रिकेटचा इतिहास मोठा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ते देखील अनेक अडचणींमधून गेले आहेत. हॅन्सी क्रोनिए प्रकरण, त्यानंतर पुन्हा एकदा संघाची उभारणी करणे, आर्थिक संघर्ष, श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय राखीव जागा, कोलपॅक नियमांमुळे झालेला तोटा अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत हा संघ मार्गक्रमण करत राहिला. भरीस भर म्हणजे महत्वाच्या स्पर्धांमध्ये आणि सामन्यांमध्ये कच खाण्याची मनोवृत्ती, ज्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लागलेला ’चोकर्स’ चा टॅग. अशावेळी या संघाने मिळवलेला हा विजय निश्चितच स्पृहणीय आहे. दक्षिण आफ्रिकेच्या  क्रिकेटमध्ये हा विजय मैलाचा दगड ठरू शकतो.   

Related Articles