अदानी, अंबानी यांना नजरेसमोर ठेवून धोरणे आखू नका   

भास्कर जाधव यांचा सरकारवर घणाघात

मुंबई, (प्रतिनिधी) : अदानी, अंबानी यांना नजरेसमोर ठेवून धोरणे आखू नका. राज्य सरकारची धोरणे ही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवूनच आखली गेली पाहिजेत. राज्यातील शेतकर्‍यांची आजची  स्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने अहंकार बाजूला ठेवावा, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधानसभेत केला. मे महिन्यातील पावसाने शेतकरी अडचणीत आला असून त्याला प्रति हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी  केली.
 
विरोधी पक्षाच्या वतीने काल विधानसभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तवावरील चर्चेला सुरुवात करताना जाधव यांनी शेती आणि शेतकरी प्रश्नी असलेल्या सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकर्‍यांना उद्देशून केलेल्या विधानांचाही त्यांनी समाचार घेतला. मत्सोद्योगाला शेतीचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करताना जाधव यांनी या निर्णयात स्पष्टता आणण्याची मागणी केली. 
 
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे आता सांगितले जात आहे. त्यामुळे तुमची ती योग्यवेळी कधी येणार? हा शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. आज शेतकर्‍याला नांगरणीसाठी स्वतःला खांद्यावर नांगर घ्यावा लागत आहे. त्याच्या पत्नीला नांगर ओढावा लागत आहे. शेतकर्‍याने स्वतःला जुंपून घेऊन नांगर ओढावा हेच सरकारचे व्हिजन आहे काय? असा सवाल जाधव यांनी केला. 
 

Related Articles