संततधारेमुळे बटाटा लागवड लांबणीवर   

शेतकऱ्यांमध्ये चिंता 

मंचर, (प्रतिनिधी) : सातगाव पठार ता. आंबेगाव भागामध्ये संततधार पाऊस पडत असल्याने बटाटा लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.पावसामुळे सातगाव पठार भागातील वेळ नदी दुथडी भरून वाहत आहे. विहिरी, बारवा, बोरवेल्स पाण्याने भरले आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे वेळ नदीला पाणी पातळीत वाढ होऊन दुसरा पूर आला आहे. अनेक शेतकर्‍यांनी बटाटा बियाणे लागवडीसाठी आणून आपल्या शेडमध्ये पसरवून मुरायला टाकले आहे. पण, संततधार पावसामुळे बटाटा लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पावसाने जर उघडीप दिली आणि चार-पाच दिवसांमध्ये जमिनीत वापसा तयार झाल्यावर बटाटा लागवडीला सुरुवात होईल. पण, पाऊस जर असाच चालू राहिला तर जमिनीत वापसा तयार होण्यासाठी अजून वेळ लागेल आणि बटाटा लागवडी लांबणीवर जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे.
 
साधारणतः जूनमध्ये बटाट्याची लागवड पूर्ण होते. मात्र, यंदा वेळेआधी झालेल्या व सुरूच असलेल्या पावसामुळे शेतातील मशागतच अद्याप पूर्ण झालेली नाही. शेतात पाणी साचल्याने बटाटा किंवा अन्य बीजांची पेरणी होऊ शकली नाही. बटाटा हे पिक वेळेवर लावणे अत्यंत आवश्यक असते. उशिरा लागवड केल्यास पुढील पिकांसाठी सुद्धा उशीर होत असतो.
- विशाल तोडकर, प्रगतिशील शेतकरी पेठ.
 
कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना सल्ला दिला जातो की, शेतात पूर्ण वाफसा झाल्यावरच बटाटा लागवड, सोयाबीन किंवा अन्य पिकाची लागवड करावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. हवामान सुधारताच योग्य सल्ल्यानुसार लागवड करावी.
- सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव.
 
पडत असलेला अति पाऊस, बटाटा बियाण्याचे तेजीत असलेले बाजारभाव, खते, औषधे यांच्या वाढलेले किमती किंवा मजुरांची टंचाई यामुळे चालू वर्षी बटाटा लागवडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी बटाटा लागवडीमध्ये जवळपास २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे.
- रामशेठ तोडकर, बटाटा व्यावसायिक पेठ.

Related Articles