महापालिका पाठवणार पाणीमीटरची बीले   

अतिरिक्त आयुक्तांकडे प्रस्ताव सादर

पुणे : पुणे महापालिकेकडून शहरासह उपनगरांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाणी मीटर बसवण्याचे काम देखील सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांना आपण पाणी किती वापरतो आणि त्यानंतर बील किती येते हे समजण्यासाठी ’डमी पाणी बिल’ पाठवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांसमोर सादर करण्यात आला असून या प्रस्तावाला अंतिम मान्यता पालिका आयुक्तांची मिळाल्यानंतर नागरिकांना डमी बिल पाठवली जातील. हे बिल नागरिकांनी भरावे लागणार नाही. केवळ ही एक चाचणी असेल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात नवीन मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी या योजनेनुसार पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे, तसेच जुन्या लाईनला सुमारे अडीच लाख पाणी मीटर बसविण्यासचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सध्या एक लाख ८० हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पालिकेला मिळणारा पाण्याचा कोटा आपुरा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. या योजनेच्या माध्यामातून समान पाणी देण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. पालिकेकडून सातत्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यानंतरही मात्र पाण्याचा अतिवापर होत असल्याचे दिसून येत आहे.
 
नागरिकांना शिस्त लागावी, पाण्याचा अतिरिक्त वापर होऊ नये, तसेच पाण्यासाठी पैसे मोजण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी पाणी मीटरनुसार बिल आकारणी केली जाणार आहे. पाण्याचे बील जर स्वतंत्र दिले तर किती पैसे द्यावे लागतील, याची माहिती या डमी बिलाच्या माध्यमातून येणार आहे. तर मिळकत करात पाण्याचे बिल दिल्यास मिळकत करात किती वाढ होईल, याचाही अंदाज येणार आहे, त्यामुळे ही डमी बिलाची संकल्पना पुढे आणली आहे. नागरिकांना महिन्याला बिल द्यावे की वर्षाला याचाही विचार केला जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले. दरम्यान, पालिका आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ही डमी बिले पाठवण्यास सुरुवात केली जाईल. यामुळे नागरिकांना मीटरद्वारे नोंदवल्या जाणार्‍या वापराची अचूक माहिती मिळेल. प्रत्यक्ष बिल आकारणी सुरू करण्यापूर्वी, नागरिकांना त्यांच्या पाणीवापराची आणि मीटरप्रमाणे येणार्‍या बिलाची माहिती व्हावी, हा उद्देश या मागे आहे.
 
या योजनेद्वारे शहरात निवासी आणि व्यावसायिक अशा एकूण सुमारे तीन लाखाचे उद्दिष्ट होते, परंतु दुहेरी कनेक्शनचा विचार करुन ते दोन लाख ५० हजार पाणी जोडपर्यंत जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक ऑनलाइन प्रणालीदेखील विकसित करण्यात आली आहे. या माहितीपूर्ण बिलांमुळे नागरिक पाणी जपून वापरतील आणि पर्यायाने पाण्याची बचत होण्यास मदत होईल. या डमी बिलाची रक्कम नागरिकांना प्रत्यक्षात भरावी लागणार नाही. हे बिल केवळ माहितीसाठी असणार आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या पाणी वापराच्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
 
असे आहे पाण्याचे गणित 
 
महापालिकेला एक लिटर पाण्यासाठी २२ पैसे खर्च येतो.
घरगुती पाणी मीटरसाठी एक लिटरसाठी ८ पैसे
व्यावसायिक पाणी मीटरसाठी एक लिटरसाठी ६० ते ६५ पैसे आकारण्याचा विचार 
 
नागरिकांना आपण किती पाणी वापरतो हे समजावे आणि मीटरनुसार येणार्‍या बिलाची सवय व्हावी, या हेतूने हे डमी बिल पाठवले जाईल. यातून पाणी वापराबाबत जनजागृती साधली जाईल. डमी बिल इ-मेलद्वारे तसेच व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. त्यामुळे यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. या संकल्पनेला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका.  

Related Articles