धोकादायक वाडे पाडण्यास विरोध करणार्‍यांचे वीज, पाणी तोडणार   

पुणे : शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील ३७ धोकादायक वाडे पाडण्यास नागरिक विरोध करत आहेत. पावसाळ्यात या वाड्यांना धोका निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या वाड्यांच्या वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला असून, वाडे रिकामे करण्यास मदतीसाठी पोलिसांना पत्र दिले आहे.
 
शहरात मध्यवर्ती भागात  आजअखेर सुमारे दोन हजार आठशे  जुने वाडे आहेत. पूर्वी ही संख्या याहूनही कितीतरी अधिक होती. कालांतराने अनेकांचा पुनर्विकास करण्यात आला. मात्र, काही वाडे मालक-भाडेकरू वाद, बांधकाम नियमावलीमुळे येणारे अडथळे, आर्थिक अडचणी यामुळे अद्यापही त्याच अवस्थेत आहेत. लाकूड आणि मातीचा वापर करून पूर्वी बांधलेले ही वाडे पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे.
 
महापालिका प्रशासनाकडून धोकादायक वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते  वाडे मालकांना नोटीस देऊन पाडून टाकण्याचे आवाहन करत आहे. यंदाही महापालिकेने तब्बल ११६ धोकादायक वाड्यांना नोटीस दिल्या आहेत. यापैकी ७६ वाडे आतापर्यंत उतरविण्यात आले आहेत. पुढील आठवड्याभरात काही उतरविण्यात येतील. परंतु ३७ वाडे धारकांकडून वाडे उतरविण्यास तीव्र विरोध होत आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नाही, तर मालकी हक्क व अन्य वाद असल्याने हा विरोध होत आहे, परंतु जीवितहानी टाळण्यासाठी महापालिकेकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.याबाबत बोलताना बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर म्हणाले, की ११६ धोकादायक वाड्यांना नोटीस बजावून त्यापैकी ७६ वाडे पाडण्यात आले आहेत. ३७ धोकादायक वाडे धारकांना वारंवार नोटीस बजावल्या आहेत. 
 
रविवार पेठेत सर्वाधिक धोकादायक वाडे
 
विरोध होणार्‍यांपैकी रविवार पेठेत सर्वाधिक नऊ धोकादायक वाडे आहेत. त्या खालोखाल घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ आणि भवानी पेठेत प्रत्येकी पाच, बुधवार पेठेत चार, नाना पेठेत तीन, सदाशिव आणि गुरुवार पेठेत प्रत्येकी दोन आणि शनिवार पेठेत एक वाडा आहे.

Related Articles