असीम सरोदे यांच्याकडून मनपा अधिकार्‍यांसह तिघांना नोटीस   

शहराध्यक्ष धीरज घाटे बेकायदा वीजचोरी प्रकरण 

पुणे : भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सानेगुरुजी नगर येथील कार्यालयात २०१२ पासून बेकायदेशीर वीजचोरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सागर धाडवे यांच्या वतीने वकील असीम सरोदे यांच्याकडून महावितरण, मनपा अधिकारी व पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
  
 महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर २०११ पासून अतिक्रमण करून धीरज घाटे व मनीषा घाटे यांच्या खासगी पक्ष कार्यालयात वीज मीटर नसताना थेट कनेक्शनद्वारे वीज वापर केला जात असल्याचे २६ एप्रिल २०२५ च्या महावितरणच्या स्थळ पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. माजी नगरसेवक धीरज घाटे, माजी नगरसेविका मनीषा घाटे व मनपा वीज वितरण आणि मालमत्ता विभागातील संबंधित अधिकारी यांनी संगनमताने शासकीय मालमत्तेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
 
आरटीआयअंतर्गत मिळालेली माहिती, गुगल इमेजेस, स्थळ पाहणी अहवाल, वीज बिलाच्या पावत्या व नकाशा अशा विविध दस्तऐवजांच्या आधारे वीजचोरी सिद्ध झाली आहे. धीरज घाटे यांचे कार्यालय, व्यायामशाळेतील एअर कंडीशनर, ट्रेड मिल व विविध उपकरणांमुळे लोड १० किलोवॅटहून अधिक असूनही अहवालात कमी लोड दाखवून कारवाई टाळण्यात आली आहे.या नोटीसमध्ये धीरज घाटे व मनीषा घाटे यांच्याविरोधात विद्युत कायदा १३५ नुसार गुन्हा नोंदवण्याची, २०१२ पासूनचा वीज वापराचा दंड वसूल करण्याची आणि संबंधित अधिकार्‍यांवर विभागीय चौकशीसह भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसारही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles