किटकजन्य आजार रोखण्यात महापालिकेला यश   

डेंगी, चिकुन गुनिया, मलेरियासारख्या रोगांवर मिळवले नियंत्रण 

पुणे : शहरात किटकजन्य आजार पसरू नयेत, त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून मोहिम राबविली होती. या मोहिमेला यश आले असून डेंगी, चिकुन गुनिया, मलेरिया या सारख्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या रुग्ण संख्या कमी करण्यात यश आल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
 
शहरासह उपनगर भागात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या दरम्यान डेंगीचे ३८२ रुग्ण, चिकुन गुनियाते ४८३ रुग्ण तर मलेरियाचे पाच रुग्ण होते. हे आजार पसरू नयेत, तसेच रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाय योजना राबिवल्या. त्याचा परिणाम म्हणून जानेवारी ते जून २०२५ या दरम्यान डेंगीचे ८ रुग्ण, चिकुन गुनियाचे आठ रुग्ण तर मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या रुग्णांची संख्या घटल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. आरोग्य विभागातील किटक प्रतिबंधक विभागाने केलेल्या परिश्रमाचे हे फलित असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली.  
 
गेल्या तीन वर्षाच्या किटकजन्य आजारग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, मलेरिया रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने किटक प्रतिबंधक विभाग नियोजनबद्ध काम करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेंगी व चिकुनगुनिया पसरविणारा एडीस इजिप्ती या डासांची पैदास घरातील, सोसायट्यांमधील पाणीसाठ्यामध्ये होत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी पूर्ण बाह्याचे कपडे परिधान करण्याचे, डास प्रतिबंधक मलम यांचा वापर करण्याचे व  दिवसा विश्राम करणार्‍या नागरिकांनी मच्छर दाणीचा वापर करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी केले आहे.
 
आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना 
 
१. नोव्हेंबर २०२४ पासून डास उत्पत्ती स्थाने अद्ययावत करून औषध फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली.
 
२. पालिकेमध्ये डास उत्पती शोध मोहिम अंतर्गत ३३ हजार ४७४ कायम डांस उत्पत्ती स्थाने तर ३७ हजार ८७४ तात्पुरते डांस उत्पत्ती स्थाने आहेत.
 
३. गप्पी मासे हे डास अळी भक्षक असल्याने पुणे शहरात १८१ गप्पी मासे पैदास केंद्रे केली असून त्यामधून नागरिकांच्या मागणी तसेच पाणी साठ्यानुसार दोन हजार ५१८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.
 
४. जलपर्णी नियंत्रण होणे करीता महाराष्ट्र शासनाच्या पाट बंधारे विभाग, केंद्र शासनाची कटक मंडळे आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून जलपर्णी होत असलेल्या भागात जलपर्णी काढून घेणेकामी पाठपुरावा करण्यात आला व  किटक नाशक औषध फवारणी नियमितपणे करण्यात आली.
 
५. २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन व १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त  प्रभात फेरी, बॅनर्स, हस्तपत्रके यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रभावी जनजागरण करण्यात आले. तसेच पालखी मार्गावर जनजागृतीपर फलक लावण्यात आले.
 
६. कंटेनर पहाणी दरम्यान डास उत्पत्ती निर्माण करणार्‍या ८१४ नागरिक, आस्थापनांना पालिकेच्या वतीने नोटीस दिली असून रक्कम ९६ हजार ३०० दंड  आकारणी करण्यात आली आहे, व सदरची डांस उत्पत्ती नष्ट करण्यात आली.
 
७. पालिकेच्या  मागील तीन वर्षाच्या किटकजन्य उद्रेक ग्रस्त भागाचा नकाशाद्वारे मँपिंग करण्यात आली असून त्याप्रमाणे औषध फवारणी मायक्रोप्लन करण्यात आले आहे. 
 
८. ज्या उद्रेक ग्रस्त भागात मागील वर्षी जास्त रुग्ण संख्या आढळून आली तेथे आगामी काळात विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे.
 
९. पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य पूर नियंत्रण आराखड्यामधील पाणी साचणार्‍या ठिकाणी औषध फवारणीचे नियोजन तयार आहे.
 
१०. पालिका कार्यक्षेत्रामध्ये मलेरिया आजाराची शीघ्र तपासणी करण्यासाठी आशा सेविकांना रक्ताचे नमुने संकलन करण्यासाठी आशा स्लाईड किट देण्यात येणार असून संकलित रक्ताचे नमुने पालिकेच्या कसबा पेठेतील हिवताप क्लिनिक येथे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मलेरियाच्या दूषित रुग्णांना समूळ उपचार देण्यात येणार आहेत.
 
११. १५ क्षेत्रीय कार्यालय येथील सर्व मलेरिया सर्व्हेलन्स इन्स्पेक्टर यांची बैठक घेऊन पारेषण काळामध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊन कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.
 
१२. किटकजन्य आजारग्रस्त रुग्णांची तपासणी करताना डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी खाजगी रुग्णालय, प्रयोग शाळा व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी  तपासणीसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले.
 
१३. किटक जन्य आजारग्रस्त रुग्णांची माहिती त्वरीत पालिकेच्या आरोग्य विभागास देण्यात यावी यासाठी सर्व खाजगी रुग्णालये, प्रयोग शाळा यांना पत्र देण्यात आले असून रुग्णांची माहिती प्राप्त होताच रुग्णांचा परिसरात त्रिस्तरीय उपाययोजना (अळीनाशक कार्यक्रम, किटक नाशक औषध फवारणी व जनजागरण) राबविण्यात येणार आहेत. 

Related Articles