चार राज्यांत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान   

नवी दिल्ली : पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केरळमधील पाच विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान घेण्यात आले. पोटनिवडणुकीचा निकाल २३ जून रोजी मतमोजणीनंतर जाहीर होईल.पश्चिम बंगालमध्ये कालीगंज विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत ३०.६४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान एजंटला जबरदस्तीने बाहेर काढला, असा आरोप काँग्रेसने केला. मात्र, सत्ताधारी काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला. तृणमूल आमदार नसिरुद्दीन अहमद यांचे फेब्रुवारीमध्ये निधन झाले होते. त्यामुळे, पोटनिवडणूक घेण्यात आली. तृणमूलने अहमद यांची मुलगी अलिफा यांना उमेदवारी दिली. भाजपने आशिष घोष तर काँग्रेसने काबिल उद्दीन शेख यांना रिंगणात उतरविले आहे. माकपने शेख यांना पाठिंबा दिला आहे.
 
केरळच्या निलांबूर विधानसभा मतदारसंघात पहिल्या चार तासांत ३०.१५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात २.३२ लाखांहून अधिक मतदार असून २६३ केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये सत्ताधारी एलडीएफचे उमेदवार एम. स्वराज आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आर्यदान शौकत, तृणमूलचे प्रदेश संयोजक आणि अपक्ष उमेदवार पी. व्ही. अन्वर आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे मोहन जॉर्ज यांचा  समावेश आहे. यूडीएफ उमेदवाराने मोठ्या फरकाने जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. एलडीएफच्या स्वराज यांनाही पोटनिवडणुकीत विजय मिळण्याची खात्री आहे. विद्यमान आमदाराने राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.
 
गुजरातमध्ये विसावदर आणि काडी विधानसभा मतदारसंघात पहिल्या चार तासांत अनुक्रमे २८.१५ टक्के आणि २३.८५ टक्के मतदान झाले. जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत २८.१५ टक्के मतदान झाले, तर मेहसाणा जिल्ह्यातील काडी येथे २३.८५ टक्के मतदान झाले. राज्य सरकारने काल दोन्ही मतदारसंघात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने (आप) दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तत्कालीन, आप आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डिसेंबर २०२३ पासून विसावदरची जागा रिकामी होती. काडी मतदारसंघाचे भाजप आमदार करसन सोलंकी यांच्या निधनानंतर ४ फेब्रुवारी रोजी ही जागा रिकामीझाली. 
 
विसावदर मतदारसंघात भाजपने किरीट पटेल आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन रणपरिया यांना उमेदवारी दिली आहे. ’आप’ने गुजरातचे माजी अध्यक्ष गोपाल इटालिया यांना विसावदरमधून उमेदवारी दिली आहे. 
 

Related Articles