रायगड जिल्ह्यात पूरस्थिती   

पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी

अलिबागः रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला त्यामुळे कुंडलिका आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. त्यामुळे निर्माण रोहा, नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
 
जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर पावसाचा कहर सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली. कुंडलिका, आंबा नद्यांनी सकाळी धोका पातळी ओलांडली. पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहायला लागली. सावित्री आणि उल्हास नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. सकाळी आठ वाजता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने या संदर्भातील अधिसूचना जारी प्रसिध्द करण्यात आली. सकाळीच्या सत्रातील शाळा तातडीने सोडण्याचे निर्देश देण्यात आले. अलिबाग, रोहा, तळा, महाड पोलादपूर या तालुक्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
 
आंबा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने पाली खोपोली मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील भेराव गावचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे या गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने, नदी किनार्‍यांवरील गावे आणि डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जगबुडीने इशारा पातळी ओलांडली 

कोकणातील रायगड जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे  जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीचे पाणी बाजार परिसरात शिरले आहे. हवामान खात्याने ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण बाजारमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुख्य बाजारमध्येही पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 

Related Articles