पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होणार   

पुणे : पुणे-मिरज दुहेरीकरण कामातील सर्वांत कठीण अशा शिंदवणे-आंबळे घाटाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-सातारा १४५ किमी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. २७९ कि.मी. लांबीच्या पुणे-मिरज मार्गापैकी २५८ कि.मी. अंतर आता कार्यान्वित झाले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत दुहेरीकरण पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे.
 
मध्य रेल्वेने पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पुण्याजवळ शिंदवणे-आंबळे घाटाचे १० कि.मी.चे दुहेरीकरण पूर्ण केले आहे. हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक, डोंगराळ, अवघड वळणांनी भरलेला व बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे येथील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण खूप कठीण होते. १७ जून २०२५ रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर नवीन दुहेरी मार्गांवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. 
 
२०१७ पासून पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. आता २२ किमी काम बाकी आहे. शिंदवणे-आंबळे दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी १४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधण्यात आला. तीव्र उतार असल्याने कामासाठी अचूक योजना करावी लागली. १३ भागांत विभागलेला एक मोठा पूल बांधला. ज्यात सर्वांत उंच खांब ४२ मीटर उंच आहे. हा पूल एका वर्षांत पूर्ण झाला. यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा १८.३ मीटर उंच आहे. ३० लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केले गेले आहेत. २३ छोटे पूल या मार्गावर बांधले गेले. यात १६ तीव्र वळणे आहेत.
 

Related Articles