बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी   

धायरी, किरकटवाडी भागांतील जलस्रोत दूषित

पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका धायरी गाव, डीएसके विश्व भागाला बसला आहे. या भागाला पाणी पुरवठा करणार्‍या बारंगणी मळ्यातील विहिरीला नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला, हे घाण पाणी विहिरीत गेल्याने जलस्रोत दूषित झाला आहे. त्यामुळे हे पाणी उपसा करून बाहेर काढून विहीर स्वच्छ केली जाणार आहे. यामुळे या भागात दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
 
धायरी, डीएसके विश्व, किरकटवाडी, नर्‍हे, नांदेड यासह अन्य भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले. काही जणांचा यात मृत्यूही झाला आहे. महापालिकेने पाण्याची तपासणी केली असता या भागातील जलस्रोत दूषित असल्याचे निष्पन्न झाले. हा भाग जीबीएस ग्रस्त असताना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
 
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे बारंगणी मळा परिसरातील नाल्याला पूर आला, सांडपाणी वाहिनीतून मैलापाणी बाहेर पडले. जवळपास दोन ते अडीच फूट इतके पाणी विहिरीच्या बाजूने जमा झाल्याने हे घाण पाणी विहिरीत जाऊन पडले. या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर त्वरित पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. विहिरीतील घाण पाणी बाहेर काढून, स्वच्छ केली जाईल. त्यानंतरच धायरी, डीएसके विश्व व अन्य भागात पाणी पुरवठा केला जाईल असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
 
महापालिकेने धायरी गावासाठी टँकर पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण डीएसके विश्वमधील महापालिकेचे १० टँकर पुरसे नाहीत, त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ही विहीर स्वच्छ करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 

Related Articles