भारत पुन्हा अवकाशात (अग्रलेख)   

‘अ‍ॅक्झिऑम’च्या ‘ड्रॅगन’ अवकाश यानाचे उड्डाण झाले आणि अमेरिकेतील केप कानावेरलमधील नियंत्रण कक्ष तसेच नवी दिल्लीतील कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च व ’इस्रो’च्या मुख्यालयात एकच जल्लोष झाला. या अवकाश यानात शुभांशु शुक्ला हा भारतीय अंतराळवीर आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. अवकाश प्रवास करणारा शुभांशु हा केवळ दुसरा भारतीय अंतराळवीर आहे. 1984 मध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या बैकोनूर तळावरून ‘सोयूझ- टी11’ या अवकाश यानातून स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा अंतराळात पोचले होते. तो भारतासाठी आश्‍चर्याचा आणि अभिमानाचा क्षण होता. अ‍ॅक्झिऑमचे हे अवकाश यान गेल्या महिन्यात झेपावणे अपेक्षित होते; मात्र कधी हवामान तर कधी तांत्रिक दोष अशा कारणांमुळे उड्डाण लांबले. अखेर परवा सगळे जुळून आले. शुभांशु यांच्याबरोबर हंगेरी आणि पोलंडचेही अंतराळ वीर आहेत. त्या देशांनाही दुसर्‍यांदा अशी संधी मिळत आहे, त्यामुळे या मोहिमेचे सूत्र ‘प्रत्यक्षात उतरलेले पुनरागमन’ (रिअलाइझ द रिटर्न) असे आहे. अमेरिकेच्या अनुभवी अंतराळ प्रवासी पेगी व्हिट्सन या मोहिमेच्या कप्तान आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी काल दुपारी हे यान यशस्वीपणे जोडले गेले.
 
गगनयानाला बळ
 
अणु आणि अवकाश संशोधन या क्षेत्रात भारताने उतरले पाहिजे हे स्वप्न पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी पाहिले. त्यामुळेच ‘इस्रो’ची स्थापना झाली. श्रीमती इंदिरा गांधी यांनीही अवकाश संशोधनाकडे लक्ष पुरवले. त्यांच्याच कारकीर्दीत देशाने अनेक उपग्रह अंतराळात पाठवले. मधल्या काळात भारताने या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. हवामानाचा अंदाज घेणे, दळणवळण, जलव्यवस्थापन अशा विकासाच्या उपक्रमांना केंद्रबिंदू मानून ‘इस्रो’चे आधीचे कार्यक्रम राबवले गेले. अधिक विकसित उपग्रह अधिक शक्तिशाली प्रक्षेपकांच्या साहाय्याने अंतराळात पाठवण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे. अन्य देशही त्यांचे उपग्रह पाठवण्यासाठी ‘इस्रो’च्या प्रक्षेपकांचा आधार घेत आहेत. मंगळ आणि चंद्र या ग्रहांवर यान व संशोधन सामग्री पाठवण्यापर्यंत भारताने मजल मारली आहे. मानवास अवकाशात पाठवण्याची ’इस्रो’ तयारी करत आहे. त्यास ‘गगन यान’ असे नाव दिले आहे. त्या मोहिमेसाठीही शुभांशु यांची निवड करण्यात आली आहे. मानवास अंतराळात पाठवणे व सुखरूप परत आणणे ही अधिक अवघड व गुंतागुंतीची बाब आहे. शुभांशुच्या या अवकाश प्रवासाने त्या संदर्भातील मोलाची माहिती व अनुभव भारतास मिळणार आहे. हे सर्व अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुमारे दोन आठवडे वास्तव्य करणार आहेत. त्या काळात ते अनेक वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांनी या स्थानकात बराच काळ वास्तव्य केल्याने त्यांच्या स्नायूंवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसले होते. त्यामुळे अवकाशात गुरुत्वाकर्षण नसताना माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तो रोखण्यास ’स्टेम सेल्स’चा वापर याचाही अभ्यास शुभांशु व सहकारी  करणार आहेत. जैविक शेतीवरही ते प्रयोग करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे माणसे व वस्तू पाठवण्यासाठी खासगी क्षेत्रास उत्तेजन देण्याचे धोरण अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन  संस्थेने स्वीकारले आहे. ब्रह्मांडातील ग्रह-तारे, अन्य घडामोडी यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हा ’नासा’चा त्यामागील हेतु आहे. ’ड्रॅगन’ यानाने उड्डाण केल्यानंतर पाठवलेल्या संदेशात ’या प्रवासात आपण एकटे नाही तर तुम्ही सर्व माझ्या बरोबर आहात. ही देशाच्या समानव अवकाश कार्यक्रमाची सुरुवात आहे’, असे शुभांशुने म्हटले, ते खरेही आहे. अवकाशात मानव पाठवणे हे केवळ प्रतिष्ठेचे प्रतीक नाही, या क्षेत्रात देशाने केलेली प्रगती त्यातून दिसते. त्या दृष्टीनेही शुभांशु यांचे अवकाशात जाणे देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. समानव अवकाश मोहिमेचा मार्ग यामुळे खुला होणार आहे.

Related Articles