साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला   

शरद पवार यांचे गौरवोद्गार 

पुणे : तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी काढले. मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती, असेही पवार यांनी नमूद केले.
 
सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीतर्फे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते ’शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहु महाराज होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे,  वसुधा जयसिंगराव पवार, प्रविण गायकवाड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रशांत जगताप, डॉ. श्रीमंत कोकाटे, रविकांत वर्पे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी उपस्थित होते.
 
शरद पवार म्हणाले, स्वराज्याच्या धामधुमीत हेच मुळशी खोरे अग्रेसर होते, अगदी सेनापती बापटांच्या मुळशी सत्याग्रहापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीशीही ही भूमी जोडली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपतींचे स्वराज्य हे भोसल्यांचे नव्हते किंवा महाराष्ट्रात राज्य करणार्‍या विविध सुलतानांसारखे एका व्यक्तींचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते, असे मत व्यक्त केले. राजे रजवाडे अनेक होऊन गेले, लोक आता त्यांना विसरले. पण हिंदवी स्वराज्य लोकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहे, असेही पवार म्हणाले.
 
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, हे स्वराज्य फक्त हिंदुंचे आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणाले नाहीत. तत्कालीन काळातील जगात सर्वत्र धार्मिकतेवर आधारित राज्य होती हे लक्षात घेतल्यावर शिवाजी महाराजांच्या ’हे राज्य रयतेचे’ या विचारांचे महत्व लक्षात येते.  त्यांनी दाखवलेला सर्वधर्मसमभाव हा आपल्या घटनेचा प्राण आहे. देशाला सध्या धर्मवादाचा धोका आहे, अशा परिस्थितीत सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला गरजेचा आहे. 

Related Articles