व्हाइट हाऊसमध्ये मुनीर यांना मेजवानी   

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये बुधवारी मेजवानी आयोजित केली होती. या संदर्भातील माहिती व्हाइट हाऊसच्या वतीने देण्यात आली.अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास व्हाइट हाऊसमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. डोनाल्ड ट्रम्प नुकतेच कॅनडाचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. जी ७ परिषदेसाठी ते गेले होते. इस्रायल आणि इराण संघर्ष अधिक उफाळून आल्यानंतर ते दौरा अर्धवट सोडून मंगळवारी अमेरिकेत परतले होते.  यानंतर त्यांनी काल मुनीर यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन केले. ही बाब अमेरिकेचे एक राजनैतिक पाऊल असल्याचे मानले जात आहे.
 
पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारने गेल्या महिन्यात मुनीर यांची फील्ड मार्शल पदावर नियुक्ती केली होती. यापूर्वी १९५९ मध्ये आयुब खान यांना हे पद दिले होते. दहशतवादी कारवायात गुंतलेल्या पाकिस्तानला एक नागरी देश म्हणून भारताने स्वीकारावे, यासाठी मुनीर यांना अमेरिका दौर्‍याचे निमंत्रण दिले. तसेच त्यांच्यासाठी खास मेजवानी दिली  आहे, असे डॉन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.  
 

Related Articles