आम्ही दहशतवाद संपवतो; तुम्ही त्यांचा गौरव करता   

अमेरिकेसह अन्य देशांना मोदी यांनी फटकारले

काननास्किस : भारत दहशतवादाचा नायनाट करत असताना तुम्ही दहशतवाद्यांचा सन्मान करत आहात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसह परदेशी देशांना बुधवारी फटकारले. 
 
कॅनडात जी -७ परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. दहशतवाद जगासाठी डोकेदुखी बनत चालला असताना परदेशी देश दहशतवाद पोसणार्‍या देशाला खतपाणी घालत आहेत. त्यांचा सन्मान करत असल्याची त्यांनी जोरदार टीका केली. दक्षिण गोलार्धात शांतता निर्माण करण्यासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. 
 
दक्षिण गोलार्धात भारत एक जबाबदार देश म्हणून कार्य करत आहे. तसेच या भागांतील देशांचा दहशवादाविरोधात एक सारखा सूर उमटायला हवा आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या देशांविरोधात आक्रमक कारवाई करण्याची गरज आहे. 

भारत-कॅनडात उच्च आयुक्तालये सुरू 

कॅनडा आणि भारताने जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील उच्च आयुक्तालये पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली. तसेच ती उघडण्याबाबत निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.. सुमारे वर्षभरापूर्वी  खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्त्येच्या विषयावरुन दोन्ही देशांचे संबंध ताणले होते. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्या कार्यकाळात निज्जरची हत्या भारतीय उच्च आयुक्तालयातील अधिकार्‍यांनी केल्याचा आरोप करुन त्यांच्या अटकेचे आदेश काढले होते. त्यानंतर भारताने अधिकार्‍याला  आणि कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावले. तसेच उच्च आयुक्तालय आणि दूतावास बंद केला होता. कॅनडाच्या काही अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती. अशीच कारवाई कॅनडाने देखील केली होती. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले होते. दरम्यान, कॅनडात मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर त्यांनी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्या अंतर्गत कॅनडात आयोजित जी ७ परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास निमंत्रणही दिले होते. 

मोदी म्हणाले...

जी- ७ देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र यावे
दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेऊ नका
पहलगाम हल्ल्याचा निषेध करुन जागतिक ऐक्य दाखवा
दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करा
आपारंपरिक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर द्यावा.
 

Related Articles