संत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान   

पुण्य उभे राहो आता| 
संताचे या कारण॥ 
पंढरीच्या लागा वाटे| 
सखा भेटे विठ्ठल॥
 
पिंपरी : टाळ-मृदंगाचा गजर, वीणेचा झंकार व तुकोबा-तुकोबा नामाचा जयघोष अशा भारलेल्या वातावरणात व भक्तीच्या कल्लोळात भागवत धर्माचे प्रतीक असलेली भगवी पताका नाचवत श्री क्षेत्र देहूगावातून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने बुधवारी प्रस्थान ठेवले. प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ साठवण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी गर्दी केली होती. इंद्रायणीचा अवघा परिसर वारकरीमय झाला होता. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. विठूनामाचा जयघोष करत फुगडी खेळत भागवतधर्मीय भक्तीरसात चिंब होत होते.     
 
हरिनामाचा गजर वारकर्‍यांचा उत्साह दुणावत होता. विठ्ठलमय झालेले वारकरी जयघोषात नाचत होते. इंद्रायणीच्या प्रवाहानेही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. हजारो भाविकांनी तुकोबांच्या पादुकांवर माथा ठेवत, तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोबांच्या चरणी आपली सेवा रुजू केली. 
 
काल पहाटे घंटानादाने देहूनगरी जागी झाली. पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रूक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. 
 
सकाळी दहा वाजता देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर, इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांची विधिवत महापूजा करण्यात आली. महापूजा सुरू असताना मंदिर आणि परिसरात विठोबा-तुकारामाच्या जयघोषाचा आवाज टिपेला पोचला. भजन-कीर्तनाचा अखंड नाद, सार्‍यांनीच भान हरपून धरलेला फुगड्यांचा फेर, टाळ-मृदुंगांचा लयबद्ध आवाज आणि बरसणारा पाऊस अशा भारलेल्या वातावरणात पालखीचे मानकरी म्हसलेकर यांनी डोक्यावर पादुका घेऊन संबळ, टाळमृदंग आणि तुतारी या वाद्यांसह वाजत-गाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. त्यानंतर पोलिसांनी देऊळवाड्यात मानाच्या दिंड्या, फडकरी, विणेकरी यांना आपआपल्या क्रमांकानुसार सोडण्यास सुरुवात केली. 
 
पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाला दुपारी अडीचच्या सुमारास प्रारंभ झाला. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. परंपरेनुसार ज्येष्ठ वारकरी मान्यवरांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, शंकर मांडेकर, अमित गोरखे, उमा खापरे, राज्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नगराध्यक्षा पूजा दिवटे यावेळी उपस्थित होते. 
 
दुपारी तीन वाजून ५८ मिनिटांनी पालखीने मंदिरातून प्रस्थान ठेवले. पालखी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आली आणि महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली. मंदिराच्या आवारामध्ये टाळ-मृदंगाचा गजर सुरू झाला. त्याबरोबरीने वारकर्‍यांचे विविध खेळही रंगले. वारकर्‍यांनी फुगडीचा आनंद लुटला. फडणवीस यांनी देखील वारकर्‍यांसोबत फुगडी खेळून सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. पालखी प्रस्थानाची तुतारी वाजली अन् पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, असा घोष करत देहूकरांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले. देऊळवाड्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात आजोळघरी पोहोचली. 
 
आज आकुर्डीत मुक्काम
 
संत तुकाराम महाराज पालखी आज (गुरूवारी) इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. अनगडशाह बाबा यांच्या दर्गाजवळ अभंग, आरती होईल. तसेच, चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. पालखी सोहळा रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. देऊळवाडा आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
 
दिंड्या थांबविल्यामुळे वारकरी आक्रमक
 
मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा आल्याने मंदिरात सोडण्यात येणार्‍या दिंड्यांना थांबविले. अश्वालाही आत सोडले नव्हते. त्यामुळे वारकरी आक्रमक झाले. पोलिसांचे सुरक्षाकडे तोडून मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी रोखले. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता एकावेळी सर्वांना सोडले तर गोंधळ होईल. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने वारकर्‍यांना मंदिरात सोडले. वारकर्‍यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles