पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?   

दुर्घटनांची दखल घेण्याची मागणी 

पुणे : एखाद्या पीएमपी बसला लागलेली आग, बसचा अपघात अथवा बसमध्ये इतर काही बिघाड झाल्यास पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याची माहिती असणे गरजेचे असते. नर्‍हे ते स्वारगेट मार्गावरील चालत्या बसमध्ये अचानक निघालेला धूर प्रवाशांच्या भितीमध्ये अधिक भर घालणारा होता. मात्र, या घटनेची माहितीच पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नसल्याचे नुकतेच दिसून आले. त्यामुळे अधिकारी कार्यालयात बसून नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची पीएमपी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.  
 
नर्‍हे गाव येथून स्वारगेटसाठी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही बस निघाली होती. या बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुलेदेखील होते. सिंहगड रस्त्याकडे बस जात असताना वडगाव फाट्यापासून बस थोडी पुढे आल्यावर अचानक बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. त्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले. ते एकदम मागच्या बाजूला पळू लागले. त्यानंतर बसचालकाने बस थांबविली. मागच्या बाजूंच्या प्रवाशांना काहीच दिसले नाही. त्यामुळे प्रवासी घाबरून खाली उतरू लागले. ज्येष्ठ नागरिक व मुलांना उतरण्यासाठी काही प्रवाशांनी मदत केली. अचानक स्माकर उडाल्याने धूर निघत असल्याचे चालकाने प्रवाशांना सांगितले. शेवटी महिला वाहकाने प्रवाशांना दुसर्‍या बसने पुढे पाठविले. त्यानंतर सर्वच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या घटनेची माहिती नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
वरिष्ठांमध्ये जागरूकता असावी 
 
बसमध्ये अचानक निघालेल्या धूरामुळे सर्वच प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न वाहक व चालकाकडून उशीरा झाला. मात्र, या घटनेची माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नसल्याचे दिसून आले. एखादा अनुचित व गंभीर प्रकार चालत्या बसमध्ये झाल्यास त्याची माहिती वरिष्ठांना असणे आवश्यक असते. त्यामुळे वरिष्ठांच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झाले आहे. एखाद्या घटनांविषयी वरिष्ठांमध्ये जागरूकता असायला हवी, असा संतप्त सवाल देखील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles