राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ   

शिक्षण विभागातर्फे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू

पुणे : या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्यास भारतीय जैन संघटनेचे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे उत्साहात प्रारंभ झाला. 
 
महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन एमएससीईआरटीच्या समता विभागाचे उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, समता विभागाच्या प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शाळा प्रबंधन समितीचे अध्यक्ष विलास राठोड, एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या प्रसंगी पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातून आलेले शिक्षक, एमएससीईआरटी अधिकारी तसेच एसएमएफचे मूल्यवर्धन तज्ज्ञ, मास्टर ट्रेनर्स आदी उपस्थित होते.
 
‘मूल्यवर्धन हा एक कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारी एक चळवळ आहे. शिक्षणमंत्री, प्रधान सचिव तसेच सर्वच अधिकार्र्‍यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात काम करण्याची संधी मिळाली, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. प्रत्येकाने स्वतःचा कार्यक्रम म्हणून या प्रशिक्षणात झोकून देऊन सहभाग व्हावे आणि राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी अथक परिश्रम करावेत, असे आवाहन डॉ. इब्राहिम नदाफ यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना केले. शांतिलाल मुथ्था, वर्षाराणी भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

Related Articles