सरकारी धान्याचा गैरव्यवहार; २०० पोती तांदूळ जप्त   

नागपूर : स्वस्त धान्य दुकानांमधून गरिबांना वाटप करण्यात येणार्‍या धान्याचा नागपुरात गैरव्यवहार होत असल्याचे उघड झाले. काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा २०० पोती तांदूळ अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी जप्त केला आहे. नागपूरच्या ताजनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद वसीम याच्याविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
अन्न पूरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन धान्य दुकानात तांदूळ, गहू यासारखे धान्य वाटप करण्यात येते. मात्र बर्‍याचदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नाही. तर काही लाभार्थी खरेदी करत नाहीत, अशा वेळी त्यांच्या वाट्याचे धान्य काळ्या बाजारात विक्री केले जाते. राज्यात अनेक ठिकाणी असे उद्योग सुरू असून, अन्न पुरवठा विभाग सर्तक झाला आहे. 
 
नागपूरच्या ताजनगरमधील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी धान्य  मालमोटारीत भरून नेत असल्याची माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी संबंधित ठिकाणावर छापा टाकला. त्यावेळी एका शेडमधून तांदळाची पोती काढून मालमोटारीत ठेवली जात असल्याचे आढळून आले. अन्न पुरवठा अधिकारी आणि पोलिसांनी २०० पोती तांदळासह धान्य आणि मालमोटार असा १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
 

Related Articles