मुशफिकुर रहीमचे दीडशतक   

गॉल : बांगलादेशाचा संघ सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बांगलादेशकडून फलंदाजी करताना कर्णधार नजमूल हुसेन शान्तो आणि संघातील अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने दमदार शतकी खेळी केली. या खेळीसह मुशफिकुर रहीमने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
 
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली. ज्यावेळी मुशफिकुर रहीम फलंदाजीला आला, त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या ३ गडी बाद ४५ इतकी होती. त्यानंतर रहीम आणि शान्तोने मिळून बांगलादेशचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून १४७ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या पहिल्या दिवसाअखेर ३ गडी बाद २९२ वर पोहोचवली. पहिल्या दिवशी शान्तो १३६ तर रहीम १०५ धावांवर माघारी परतला.
 
यासह मुशफिकुर रहीमच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. मुशफिकुर रहीम हा कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेत फलंदाजी करताना शतक झळकावणारा सर्वात वरिष्ठ खेळाडू बनला आहे. त्याने वयाच्या ३८ व्या (३८ वर्षे ३९ दिवस) वर्षी शतक झळकावलं आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने पाकिस्तानचा माजी फलंदाज युनूस खानला मागे सोडलं आहे. युनूस खानने वयाच्या ३७ व्या (३७ वर्ष, २१६ दिवस) वर्षी शतक पूर्ण केलं होतं. तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोलंबोत फलंदाजी करताना वयाच्या ३७ व्या (३७ वर्ष ९३ दिवस) शतक झळकावलं होतं.
 
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर गॉलच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात बांगलादेशच्या सलामी जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. सलामीला आलेला शदनम इस्लाम अवघ्या १४ धावांवर माघारी परतला. तर अनमूल हकला खातंही उघडता आलं नाही.तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोमिनूल हकने २९ धावांची खेळी केली. कर्णधार नजमूल हुसेन शान्तोने १४८ धावांची खेळी केली. तर मुशफिकुर रहीमने १५० हून अधिक धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४०० पार पोहोचवली आहे.

Related Articles