पहिल्या कसोटीतून बुमरा बाहेर?   

लंडन : भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेची सुरुवात २० जूनपासून होत असून, त्याचा उत्साह सर्व खेळप्रेमींमध्ये जोमाने जाणवतो. या मालिकेत भारतीय संघाला केवळ इंग्लंडवर विजय मिळवायचा नाही, कारण २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा ठसा उमटवायचा आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व युवा आणि धडाकेबाज शुभमन गिल करत आहे. यादरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन स्पिनरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्याने कर्णधार शुभमन गिलला पहिल्या कसोटीत बुमराला न खेळवण्याचा सल्ला दिला आहे, जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत.
 
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने २० जूनपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला न खेळवण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, ऑस्ट्रेलिया दौर्‍यात जखमी झालेला जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात यावी. आणि दुसर्‍या कसोटी सामन्यातून त्याला खेळवण्यात यावे, जेणेकरून तो अजून तरोताजा आणि अधिक प्रभावी ठरेल.एका मुलाखतीदरम्यान ब्रॅड हॉग म्हणाला, बुमराला लॉर्ड्सवर होणार्‍या सामन्यासाठी राखून ठेवले पाहिजे, जिथे चेंडू जास्त हलतो आणि जिथे तो एका स्पेलमध्ये सामन्याची दिशा बदलू शकतो.
 
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू म्हणाला की, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा मॅच विनर खेळाडू आहे. म्हणून जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे तिथे त्याचा वापर करा. त्याच्याकडून तुम्हाला सर्वात जास्त फायदा कुठे मिळेल? कारण तो सामन्याचा दिशा बदलू शकतो. तो मालिका पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच त्याला निश्चितपणे लॉर्ड्सवर खेळवले पाहिजे. त्यामुळे जर मी तिथे असतो तर मी पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवले नसते. टीम इंडिया १० जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. जसप्रीत बुमराह म्हणजे भारताचा ’ब्रह्मास्त्र’ आहे, ज्याच्या एका स्पेलमध्ये सामना फिरू शकतो. त्यामुळे गंभीर आणि गिल यांच्यासाठी हा मोठा निर्णय असेल. बुमराह खेळतो की विश्रांती घेतो?  आता सर्वांच्या नजरा पहिल्या कसोटीसाठी जाहीर होणार्‍या अंतिम संघाकडे आहेत. 
 
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध ९ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २६.२७ च्या सरासरीने ३७ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा ५ विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाला बुमराहकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. यासाठी त्याच्यासाठी तंदुरुस्त राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Related Articles