शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी   

बर्मिंगहॅम : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडमध्ये जबरदस्त कामगिरी केली इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीत भारताच्या कर्णधाराने दमदार २६९ धावांची खेळी केली. यासह तो इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करता आलेली नाही. भारतीय संघाच्या १४५.४ षटकांत ५७५ धावा झाल्या आहेत. यावेळी ९ फलंदाज बाद झाले.  
 
भारताचा कर्णधार शुबमन गिल हा परदेशात (इंग्लंड, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) द्विशतकी खेळी करणारा आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी आशियातील कुठल्याही कर्णधाराला परदेशात फलंदाजी करताना द्विशतकी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे गिलने बर्मिंघममघ्ये इतिहासाला गवसणी घातली आहे. यासह शुबमन गिलच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. शुबमन गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना २०० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी कर्णधार महमद अझरूद्दीन यांच्या नावावर होता. 
 
महमद अझरूद्दीन यांनी १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर फलंदाजी करताना १७९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी हा रेकॉर्ड करणारे ते पहिलेच भारतीय कर्णधार ठरले होते. आता गिलने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. १८० धावांचा पल्ला गाठताच गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.
 
शुबमन गिलच्या विक्रमी द्विशतकी खेळीसह भारतीय संघाने बर्मिंघम कसोटीतील पहिल्या डावात ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने ८७ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ८९ धावा केल्या. यादरम्यान गिलने दुहेरी शतक झळकावलं. यासह भारताने पहिल्या डावात ५०० धावांचा पल्ला गाठला आहे.
 
संक्षिप्त धावफलक : भारत : गिल २६९, जैस्वाल ८७,जडेजा ८९, वॉशिंटन सुंदर ४२, करूण नायर ३१, पंत २५, अकाशदीप ६ एकूण १४६.४ षटकांत ५७९/९
 

Related Articles