अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)   

’इंडिया’ आघाडी सुस्थितीत आहे आणि २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक ही आघाडी एकत्रितपणे लढेल असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये जाहीर केले. आगामी निवडणूक आपला पक्ष इंडिया आघाडीच्या अंतर्गतच लढेल ही बाब त्यांनी दोन दिवसांत दोनदा अधोरेखित केली. ज्यांना आघाडीतून बाहेर पडायचे असेल, ते खुशाल जाऊ शकतात असेही ते म्हणाले. त्यांची ही विधाने काँग्रेसला दिलासा देणारी आहेत; पण राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना तसे वाटते का? हाही प्रश्न आहे. काँग्रेसचे सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांनी अलीकडे काही विधाने केली. राज्यात  काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याची नाराजी त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी अखिलेश यांना विचारले असता; अशा विधानांकडे आपण लक्ष देत नाही, ‘इंडिया’ आघाडी एकसंध आहे आणि आपण निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात विधानसभा  निवडणुका २०२७ मध्ये होणार आहेत; पण पंचायत निवडणुका पुढील वर्षी मे महिन्यात होणार आहेत. समाजवादी पक्ष आणि ’इंडिया’ आघाडीची तेव्हाच परीक्षा होणार आहे. ग्रामीण भागात समाजवादी पक्ष व काँग्रेसला काही स्थान आहे की नाही हे तेव्हा कळेल. विधानसभा अजून दूर आहे.
 
परस्पर आधाराची गरज
 
उत्तर प्रदेशात अनेक गावे महापालिका किंवा नगर पालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने पंचायतीच्या मतदार संघांची फेर आखणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ७६८ जागा मिळवून भाजप पहिल्या स्थानी होता. समाजवादी पक्षाला ७५९ व काँग्रेसला १२५ जागा मिळाल्या होत्या; पण ९४४ अपक्षांनी बाजी मारली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत हजारो जागा असतात शिवाय सरपंच आदी पदे असतात. मात्र, या पातळीवर कोणता पक्ष बळकट आहे, हे त्यावरून कळते. साहजिकच ’इंडिया’ आघाडीने गावांकडे आधी लक्ष देणे आवश्यक आहे, असे असताना इम्रान मसूद विधानसभेसाठी जागा वाटपाबद्दल का बोलत आहेत आणि काँग्रेसचे राज्य व केंद्र पातळीवरील नेते त्यांना रोखत का नाहीत ते कळत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचे सूत्र  २०२७च्या विधानसभा निवडणुकीसाठी योग्य ठरणार नाही, असे मसूद यांनी म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ६३ व काँग्रेसने १८ जागा लढवल्या होत्या. समाजवादी पक्षाने ३७ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या होत्या. २००९ नंतरची काँग्रेसची ही उत्तम कामगिरी होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ३९९ जागा लढवल्या; पण केवळ २ जागा जिंकल्या हे विसरता कामा नये. असे असताना मसूद आपला पक्ष २०० जागा लढवण्यास तयार असल्याचे कशाच्या आधारावर म्हणत आहेत? भाजपने ५७ जागा गमावल्या असल्या तरी त्यांनी २५५ जागा जिंकल्या हे लक्षात घेतले पाहिजे. बहुजन समाज पक्षामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असे गृहीत धरले तरी काँग्रेसला राज्यात मोठा जनाधार नाही, ही बाब कायम राहते. तरीही अखिलेश आघाडी कायम असल्याचे म्हणत आहेत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, की अजून काही त्यामागे आहे? दोनच दिवसांपूर्वी अखिलेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात पसमंदा मुस्लिम समाजाच्या नेत्यांची भेट घेतली आणि आपण सत्तेत आल्यास विविध सवलती देण्याचे आश्वासन त्यांना दिले. या वर्गास आपल्याकडे खेचण्याचे भाजप प्रयत्न करत आहे, या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते. मसूद यांच्या विधानांमुळे मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण होण्याची भीती समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांना वाटत आहे. अखिलेश यांच्या समोर दिल्लीचे उदाहरण असावे. ‘आप’ने काँग्रेसला विरोध केला आणि सत्ता गमावली. काँग्रेसला दुखावल्यास तो पक्ष आपले नुकसान करू शकेल, हे त्यांनी जाणले असावे. एकत्र राहून लोकसभेत केली तशी कामगिरी करता येईल व कदाचित सत्तेपर्यंत पोचता येईल असे समीकरण मांडून अखिलेश यांनी एकत्र राहण्याची ग्वाही दिली असेल.

Related Articles