हवाई हल्ल्याने तेहरान हादरले   

शेकडो नागरिक ठार; अनेक जखमी  

तेहरान : इस्रायलने बुधवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यात शेकडो जण ठार झाले आहेत. आज काही क्षेपणास्त्रांचा मारा इराणने इस्रायलच्या दिशेने केला. मात्र, त्यांची संख्या का कमी झाली ? याचे उत्तर दिलेले नाही. इस्रायलने यापूर्वीच क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केली आहेत. त्यामुळे त्यांची संख्या घटल्याचे दिसते.  
 
तेहरानसह विविध ठिकाणी आतापर्यंतच्या हल्ल्यात ५८५ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३२६ जण जखमी झाल्याचा दावा मानवी हक्क संघटनेने केला. हवाई हल्ल्याला इराणने यापूर्वी प्रत्युत्तर दिले. त्यात ४०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागली असून आतापर्यंत २४ नागरिकांचा मृत्यू झाला. 
 
वॉशिंग्टन येथील मानवी हक्क संघटनेने सांगितले की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी २३९ नागरिकांची ओळख पटली असून त्यात १२६ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, इराणमध्ये २०२२ मध्ये हिजाब  विरोधात महिलांनी तीव्र आंदोलने केली होती. त्यात तरुणी माशा आमिनीचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आंदोलन भडकले होते. त्यात ठार झालेल्यांची आकडेवारी देखील दिली.इराण आणि इस्रायल संघर्षात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला ? याची आकडेवारी इराणकडून जाहीर केली जात नाही. सोमवारी सरकारी आकडेवारीनुसार २२४ जणांचा मृत्यू तर १ हजार २७७ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 
 
इस्रायलने सलग सहाव्या दिवशी कारवाई सुरू ठेवली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. तेहरानच्या पूर्वेकडील हाकीमियेह येथील पॅरामिलिट्री रेव्ह्यूलेशनरी गार्डच्या प्रशिक्षण स्थळावर त्यापैकी एक हल्ला झाला.अण्वस्त्र निर्मितीच्या टप्प्यावर इराण पोहोचल्याच्या संशयावरुन अण्वस्त्र आणि लष्करी ठिकाणांवर प्रामुख्याने आक्रमक कारवाई केली होती. तेहरान तातडीने रिकामे करा, असा इशारा तीन लाखांवर नागरिकांना नुकताच इस्रायलने दिला होता. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने हजारो नागरिकांचे पलायन सुरू आहे. अनेकांनी तेहरान सोडले देखील आहे. त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी इराणच्या सीमेवरील अर्मेनियात आश्रय घेतला आहे.

इराण आणि इस्रायल -अमेरिकेची भूमिका

आमचा अणु कार्यक्रम शांततेसाठी सुरू आहे. अजूनही आम्ही अण्वस्त्रधारी देश झालेलो नाही. ६० टक्के समृद्ध युरेमियमचा साठा केला आहे. तो ९० टक्केपर्यंत वाढेल तेव्हाच अण्वस्त्रे विकासित करता येतील, अशी भूमिका इराणची आहे. मात्र इराणचा हा कार्यक्रम अमेरिका आणि इस्रायलला अमान्य आहे. तो त्वरित बंद करावा, इराणला अणुबाँब बनवू देणारच नाही, अशी दोन्ही देशांची भूमिका आहे. त्यात इस्रायल अधिक आक्रमक आहे. त्यासाठी त्याने इराणवर सहा दिवसांपूर्वी कारवाई करुन अणु कार्यक्रम सुरू असलेली ठिकाणे तसेच लष्करी ठाणी नष्ट केली. दरम्यान आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाकडून अणु कार्यक्रमावर लक्ष आहे. झालेली तपासणी अपूर्ण असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या मते अजून इराण अणुबाँब निर्मितीपर्यंत पोहोचलेला नाही. दरम्यान, अणु करार करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ६० दिवसांची मुदत दिली होती. ती नुकतीच संपली असून अजूनही राजनैतिक पातळीवर प्रश्न मार्गी लावण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 

खामेनींची लपलेली जागा माहीत असून मारणार नाही : ट्रम्प 

वॉशिंग्टन :  इराणने तातडीने शरण यावे, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी जेथे लपले आहेत ती जागा आम्हाला माहित आहे मात्र, त्यांना तूर्त ठार मारणार नाही, असेही ट्रम्प यांनी टाकलेल्या एका पोस्टमध्ये नमूद केले. तसेच पश्चिम आशियात लढाऊ विमाने पाठवण्यासही अमेरिकेने सुरुवात केली आहे. ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंंजामिन नेतन्याहू यांनी परिस्थितीवर चर्चा केली.नेमकी चर्चा काय झाली ? याचा तपशील सार्वजनिक केलेला नाही. 

खामेनी यांच्याकडून युद्धाची घोषणा

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी इ इस्रायलविरोधात युद्धाची घोषणा बुधवारी केली. इस्रायलच्या 'ऑपरेशन लायन राइजिंंग'ला सडेतोड उत्तर 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थर्ड'द्वारे दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. इस्रायलच्या प्रत्येक हल्ल्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्यााचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील प्रामुख्याने पर्शियन आखातात सघर्षाचे रुपांतर मोठ्या युद्धात होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. 

Related Articles