नर्‍हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध   

पुणे : नर्‍हे येथील कृष्णाईनगर आणि गोकुळनगर परिसर गेल्या अनेक दिवसांपासून विविध नागरी समस्यांनी त्रस्त झाला आहे. रस्त्यांवरील मोठे खड्डे, सतत वाहणारे ड्रेनेज, अस्वच्छता, कचर्‍याचे ढीग, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी या गंभीर समस्या स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून अनोखा निषेध नोंदवत खड्ड्यांमध्ये गुलाबाचे रोप लावून प्रशासनाचे लक्ष वेधले. 
 
या वेळी भूपेंद्र मोरे यांनी नागरिकांसह कृष्णाईनगर व गोकुळनगर परिसरातील विविध ठिकाणी पाहणी केली. या उपक्रमात मिलिंद मराठे, हरीश वैद्य, लतीफ शेख, सुशील भागवत, विशाल खरात, सुरज दांगडे, सुनील पढेर, बाळू मते यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. अनेक भागांमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून सर्रास वाहत असून, या घाणीमुळे नागरिक विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना तोंडावर रूमाल बांधून चालावे लागत आहे. तसेच या सांडपाण्यामुळे साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.  नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहेत, असा संताप संताप मोरे यांनी  व्यक्त केला.  येथील त्वरीत समस्या सोडवून उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला.

Related Articles