व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा   

पालक संघटनेची मागणी

पुणे : जेईई, नीट यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश इयत्ता अकरावी व बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात करावा, अशी मागणी महापेरेंट्स पालक संघटनेने राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.सध्या ‘इंटिग्रेटेड कॉलेज’च्या नावाखाली अनेक खाजगी संस्थांकडून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे.  या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना नीट, जेईईसारख्या परीक्षांमध्ये यश मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत आहे. तसेच पालकांचेही लाखो रुपये वाया जात आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
संघटनेचे दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक महाविद्यालये व कोचिंग क्लासेस ‘इंटिग्रेटेड’ शिक्षणाच्या नावाखाली बोर्डाच्या उपस्थिती नियमांकडे दुर्लक्ष करून व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करवून घेतात. यामुळे पालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तरीही यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर शालेय अभ्यासक्रमातच नीट, जेईईसारख्या परीक्षा डिझाइन करून समाविष्ट कराव्यात, यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त क्लासेस किंवा इंटिग्रेटेड कॉलेजची गरज भासणार नाही.
 
राज्य सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन अशा इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी, तसेच शालेय अभ्यासक्रमातच व्यावसायिक परीक्षांची पूर्वतयारी होईल, असा अभ्यासक्रम तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles