ठग लाइफचे प्रदर्शन बंदुकीच्या धाकाने चित्रपट रोखू नका   

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारले

नवी दिल्ली : अभिनेते कमल हासन यांचा चित्रपट ठग लाइफ कर्नाटकात प्रदर्शित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे.  नागरिकांच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवता येणार नाही, अशा शब्दांत चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालणार्‍या कर्नाटक सरकारला आणि हासन यांनी वादग्रस्त विधान प्रकरण माफी मागावी, असे निरीक्षण नोंदविणार्‍या कर्नाटक उच्च न्यायालयाला देखील फटकारले आहे. 
 
कमल हासन यांनी कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला, असे वादग्रस्त वक्तव्य  काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे भाषायुद्ध भडकले होते. यानंतर या विषयावर अधिक तणाव वाढू नये, यासाठी कर्नाटक सरकारने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली होती. जमाव आणि सुरक्षा रक्षक रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी बंदी घालत असल्याचे  सरकारने सांगितले होते. चित्रपट प्रदर्शित केला जावा, अशी मागणी करत एम. महेश रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान अर्ज केला होता. 
 
न्यायाधीश उज्जल भुयान आणि मनमोहन यांच्या पीठाने निकाल दिला की, चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालता येणार नाही. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. पण, चित्रपट रसिकांच्या डोक्यावर बंदुकीची नळी रोखून त्यांना तो पाहण्यापासून रोखता येणार नाही, असे कर्नाटक सरकारला बजावले. तसेच चित्रपट प्रदर्शनासाठी एक दिवसाचा वेळ दिला आहे. केंद्रीय चित्रपट मंडळाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे तो राज्यात सरकारला प्रदर्शित रकरावा लागणार आहे. हासन यांनी काही विधान केले असेल तर सुवार्तिक सत्य म्हणून ठरविले जाता कामा नये. त्यावर कर्नाटकातील जनतेत चर्चा झाली असेल. 
 
पण, त्याचा चुकीचा अर्थ काढून चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालणे अयोग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाला देखील सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. वादग्रस्त विधान प्रकरणी हासन यांनी माफी मागावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच निरीक्षणही नोंदविले होते. तशी माफी मागण्याची हासन यांचे काम नसल्याचे आदेशात नमूद केले. 

Related Articles