दिवे घाटातील पालखी महामार्गाला कचरा डेपोचे स्वरूप   

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा अजब कारभार

निलेश जगताप

सासवड : श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ९६५ या पालखी मार्गावरील हडपसर ते सासवड या दरम्यानचा दिवे घाट हा कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. हा पालखीमार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. आषाढी वारीच्या काळात पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आणि वर्षभर लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांसह हजारो पर्यटक आणि वाहनचालक या महामावरुन प्रवास करीत असतात. तसेच सध्या पावसाचे दिवस असल्याने या दिवे घाटाला पर्यटनाचे वलय प्राप्त झाले आहे. येथून प्रवास करताना नेहमीच आल्हाददायक वाटते. अशा या दिवे घाटाला कचर्‍याच्यासमस्येने ग्रासले आहे.
 
 सासवड - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकराणचा अजब व गलथान कारभार समोर येत आहे. यामुळे नागरिक व वारकर्‍यांकडुन मोठ्या प्रमाणात संताप देखील व्यक्त केला जात आहे. पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचा व आषाढी वारीच्या काळात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुख्य टप्पा व पालखी सोहळ्याचा अवघड चढणीचा दिवेघाट हा पालखी सोहळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परंतु, या दिवेघाटात वर्षभर कचर्‍याचे साम्राज्य असतेच आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष आहे. सध्या मात्र सालाबाद प्रमाणे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिवेघाट स्वच्छ करण्याचा व दिवेघाटातील कचरा काढण्याचे काम सुरू आहे, परंतु खरंच दिवेघाट स्वच्छ केला जातोय का? हा देखील प्रश्न निर्माण होतो आहे, कारण दिवेघाटातील कचरा उचलून नेण्याऐवजी केवळ महामार्गावरून उचलून तो पलीकडे रस्त्याच्या कडेच्या बॅरिकेटच्या पलीकडे व दरीत टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केवळ कचरा उचलण्याचे व विल्हेवाटीचा फार्स केला जातोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 
 
दिवे घाटाच्या पायथ्याला व दिवेघाटात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येतो आहे. यामध्ये मृत जनावरे, हॉटेल मधील घाण, शहरातील ओला कचरा, मातीचा राडा रोडा, उसाची रस काढलेली चिपाडे, कुजलेला नासलेला भाजीपाला, खराब फळे आदी कचरा याठिकाणी रस्त्याच्या कडेलाच टाकला जातो. काही वेळ तर तो रस्त्यावरही येत असल्याने वाहनांचे किरकोळ अपघातही झाले आहेत. याठिकाणी हा कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वणवे देखील लागण्याच्या घटना घडल्या आहेत. 
 
दिवे घाट मार्गे २२ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी येणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक हॉटेल चालक तसेच पुणे मार्केटयार्ड येथील ग्रामिण भागातून भाजीपाला वाहतूक करणारे टेम्पो चालक भाजी मंडईतील सडकी फळे, बटाटे, पालेभाज्या, कचरा दिवे घाटात आणून टाकतात. 
 
हा ओला कचरा असल्याने तसेच घाटाच्या मध्यावर मृत जनांवरांची कातडी देखिल टाकल्याने त्याची प्रचंड दुर्गंधी येते. हा प्रकार असाच राहीला तर पंढरपूर वारी दरम्यान येणार्‍या वारकरी, भाविकांना संसर्ग जन्य आजार होवू शकतात. तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. 
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिवेघाटातील कचरा काढण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी कचरा उचलण्याऐवजी रस्त्याच्याकडेला व दरीत टाकला जातोय का? याबाबतीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल.

- अभिजीत औटी, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

Related Articles