भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी   

सातारा, (प्रतिनिधी) : सर्वांत उंचावरून तीन टप्प्यात कोसळणारा धबधबा अशी जगभर ओळख निर्माण झालेल्या भांबवली - वजराई धबधब्याला गेल्या पंधरा दिवसांत तब्बल अडीच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट देऊन धबधब्याचा फेसाळणार्‍या पाण्यासह निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.जागतिक वारसास्थळ असणार्‍या कास पुष्प पठारापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर भांबवली-वजराई धबधबा आहे. सर्वांत उंचावरून तीन टप्प्यात पाणी कोसळते. पांढरेशुभ्र फेसाळणार्‍या पाण्याचे विलोभनीय दृश्य अनुभवावयास मिळत असल्याने पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे. त्यासोबत घनदाट जंगलातून पायवाट, हिरवेगार डोंगर, छोटे छोटे धबधबे, अधूनमधून पावसाच्या सरी सोबत धुक्याची दुलई असा नजारा जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून अनुभवायला मिळत आहे.
 
मे महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने जून महिन्यापासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली यांच्याकडून पर्यटकांच्या सोयीसुविधा, सुरक्षितता आणि मार्गदर्शनासाठी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, पर्यटकांनी समितीस सहकार्य करावे, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे. 
 
प्रतिव्यक्तीस ७० रुपये प्रवेश शुल्क आकारून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली भांबवली समितीकडून धबधब्याच्या पर्यटनास प्रारंभ करण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांत राज्यभरातील तब्बल अडीच हजारांहून अधिक पर्यटकांनी धबधब्यासह येथील निसर्गाचा आनंद लुटला आहे.
 

Related Articles