कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा   

लॉर्ड्स  : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आल्यापासून कसोटी क्रिकेटचा थरार आणखी रोमांचक झाला आहे. आता आपल्याला संघांमध्ये रोमांचक लढाई पाहायला मिळते. पण, ते अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, आयसीसी नवा फॉर्म्युला घेऊन येणार आहे. एका अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद २०२७-२९ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता देणार आहे, परंतु भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तिन्ही देश एकमेकांविरुद्ध पारंपारिक पाच दिवसांचे सामने खेळतील. सामन्यांची संख्या एका दिवसाने कमी करण्याचा निर्णय एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बदलाकडे निर्देश करत आहे.  
 
गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ डब्ल्यूटीसी सायकलसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अंतिम सामन्यादरम्यान यावर चर्चा करण्यात आली जेणेकरून नियम वेळेत मंजूर करता येईल आणि त्यासाठी नियम बनवता येतील. त्यात म्हटले आहे की, ’इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अजूनही अ‍ॅशेस, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी असेल. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी शुक्रवारी हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे.
 
अहवालानुसार, ’वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास टाळाटाळ करतात, परंतु चार दिवसांच्या क्रिकेटकडे वाटचाल केल्याने संपूर्ण तीन कसोटी मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात खेळता येईल. अहवालात म्हटले आहे की, ’चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी, एका दिवसातील खेळण्याची वेळ दररोज किमान ९८ षटके केली जाईल. सध्याच्या पाच दिवसांच्या कसोटीत, एका दिवसात जास्तीत जास्त ९० षटके टाकली जातात. 

Related Articles