तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार   

नागरिकांनी तेहरान सोडावे; इस्रायलचा इशारा

तेहरान /जेरूसलेम  इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमस्थळी आणि लष्करी ठिकाणांवर पाच दिवसांपूर्वी इस्रायलने आक्रमक हल्ले केले होते. यानंतर  तीन लाखांवर नागरिकांनी तेहरान सोडावे, असा इशारा इस्रायलने आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. त्यामुळे  तेहरान आणि परिसरात  इस्रायलकडून हवाई हल्ल्याची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पर्यायाने इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखी पेटणार आहे. 
 
तत्पूर्वी इस्रायलच्या लष्कराने आवाहन केले की, तेहरान आणि परिसरातील ३ लाख ३३ हजार नागरिकांनी परिसर सोडावा. पश्चिम आशियातील तेहरान हे सर्वात मोठे शहर आहे. तेथे सुमारे एक कोटी नागरिक राहतात. ही संख्या इस्रायलच्या लोकसंख्येएवढी आहे. संघर्ष सुरू झाल्यानंतर नागरिकांनी तेहरानमधून पलायन करण्यास सुरूवात देखील केली आहे. त्यात आता इस्रायलने नागरिकांना तेहरान सोडण्याचा इशारा दिला. इराणचे वरिष्ठ लष्करी नेते, अणुशास्त्रज्ञ, युरेनियमचे साठे असलेली ठिकाणे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे कार्यक्रम राबविणारी स्थळे यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे अण्वस्त्रे असलेल्या इमारतीपासून नागरिकांनी दूर राहावे, असा सल्ला पूर्वीपासून देत आलो आहोत.  आतापर्यतच्या हल्ल्यात  २२४ नागरिकांचा मृत्यू झाला असून  हजार २७७ जण जखमी झाले आहेत.
 
इराणनेही ३७० क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागून जोरदार प्रत्त्युत्तर दिले. त्यात इस्रायलचे २४ नागरिक ठार झाले होते. ५०० हून अधिक जण जखमी झाले. इस्रायलच्या लष्कराने काल सांगितले की, इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. उत्तर भागांत भीषण स्फोट झाले. 

तेहरानमध्ये घबराट, व्यापारपेठा बंद

तेहरानमधील बाजारपेठेत काल शुकशुकाट होता. व्यापारपेठा आणि व्यवहार बंद होते. कधी काय होईल, याच्या धास्तीने ती बंद ठेवली होती. कोरोना काळात आणि सरकारविरोधी निदर्शनावेळी जसा शुकशुकाट होता तसा दिसून आला.  तेहरानच्या पश्चिम भागातील रस्त्यावर वाहनांतून नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र होते वाहनांची रांग लागली होती. नागरिक कॅप्सिकन समुद्राच्या दिशेने जात होते. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हल्ल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. 

इस्रायलचा दावा

इराणच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण
जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे १२० क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट
लढाऊ विमानांनी दहा  कमांड सेंटर उडविली
दूरचित्रवाणी मुख्यालयावर हल्ला, आठ कर्मचारी ठार

ट्रम्प कॅनडातून घाईघाईने अमेरिकेत परतले

कॅनडातील जी ७ परिषदेत उपस्थित राहिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी रात्री  एअर फोर्स वन विमानाने  घाईघाईने वॉशिंग्टनला परतले. या वेळी त्यांनी सांगितले की, इराणकडे अणुबाँब असता कामा नये, नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने तेहरान सोडावे. मी अजूनही राजनैतिक पातळीवर प्रश्न सोडविण्याची खटपट करत आहे. त्यासाठी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि  विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना इराणला पाठवणार आहे. ते इराणी नेत्यांशी चर्चा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

फ्रान्सच्या अध्यक्ष मॅक्रोन यांच्यावर ट्रम्प संतापले

इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्षबंदी व्हावी, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातील जी ७ परिषद सोडली आणि ते वॉशिंग्टनला तातडीने परतले, असे वक्तव्य फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुल मॅक्रोन यांनी केले होते. त्त्यामुळे त्यांच्यावर ट्रम्प संतापले आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी  मॅक्रॉन यांनी वक्तव्य केल्याची टीका त्यांनी केली. मॅक्रोन यांचे वक्तव्य सर्वस्वी चुकीचे आहे. मी तातडीने वॉशिंग्टनला परतलो आहे हे सत्य आहे. पण, संघर्षबंदीसाठी नाही. माझा आणि संघर्षबंदीचा काही एक संबंध नाही. आम्ही संघर्षबंदीपेक्षा अधिक चांंगले पाहात आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

Related Articles