आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्‍यांची गच्छंती   

नवी दिल्ली : आयफोनचे पुढचे मॉडेल ‘आयफोन १७’ चे उत्पादन भारतात होणार असल्याने उत्सुकता वाढलेली असतानाच आता फॉक्सकॉन कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयफोनची निर्मिती फॉक्सकॉन कंपनीकडून केली जाते. तमिळनाडू राज्यात फॉक्सकॉनचे आयफोन उत्पादनाचे युनिट आहे. भारतात आणखी काही कारखाने काढण्याचा मानस फॉक्सकॉन आणि पलकडून व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही पल भारतात उत्पादन वाढविण्यावर ठाम होते. मात्र, आता फॉक्सकॉनच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्‍यांची गच्छंती करण्यात आली आहे.ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या कारखान्यातून जवळपास ३०० कुशल चिनी कर्मचार्‍यांना मागच्या दोन महिन्यांत चीनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या भारतातील कारखान्यात तैवानी कर्मचारी कार्यरत आहेत. 
 
ब्लुमबर्गच्या माहितीनुसार, चिनी कर्मचारी मायदेशी परतल्यामुळे उत्पादनाचा वेग आणि भारतीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. मात्र, चीनकडून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ बाहेरच्या देशात जाऊ नये, असा प्रयत्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या सरकारने याबद्दल प्रयत्न केले होते. यामुळे मूळची तैवानची कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने तैवानी तंत्रज्ञान आणि तैवानी अभियंते आणि तंत्रज्ञ यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच भारतील कर्मचार्‍यांना तैवानी कर्मचारी यापुढे प्रशिक्षण देणार आहेत.

कुशल मनुष्यबळ बाहेर जाऊ देण्यास चीनचा विरोध

ब्लुमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे सरकार यंत्रणांवर दबाव निर्माण करून तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ देशाबाहेर जाऊ देण्यास विरोध करत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या छुप्या व्यापार युद्धाचा हा परिणाम असून, चीनला आपली उत्पादन क्षमता बाहेरील देशात जाऊ द्यायची नाही, असे सांगितले जात आहे.
 

Related Articles