पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी   

खड्ड्यांमुळे नागरिक वैतागले 

पुणे : पहाटे पडलेला मुसळधार पाऊस आणि दिवसभर सुरु असलेली संततधार, रस्त्यांवरून वाहणारे पाणी, खड्डेमय रस्ते, मंदावलेली वाहतूक, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये साचलेले पाणी, कोसळलेली झाडे, खड्ड्यात आदळणारी वाहने आणि पुणेकरांची प्रचंड गैरसोय... असे चित्र सोमवारी शहर आणि उपनगरात पाहण्यास मिळाले. 
 
मागील चार दिवसांपासून शहरात पावसाचे सातत्य कायम आहे. काल पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पहाटेपासूनच रस्ते जलमय झाले. त्यानंतर ढगाळ वातावरणासह दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत राहिला. त्यामुळे रस्त्यांसह सखल भागातील पाणी रात्री उशिरापर्यंत कमी झालेच नाही. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. तर काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रस्त्यांवरून वाहणार्‍या पाण्यातून वाहन चालविताना चालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत होती. वाहत्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे खड्ड्यांत आदळून काही वाहनांचे नुकसानही झाले. 
 
वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांना कार्यालय तसेच कामाच्या ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला. सकाळी भिजतच कामाच्या ठिकाणी पोहचलेल्या पुणेकरांना सायंकाळी भिजतच घर गाठावे लागले. पावसामुळे महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावरील सराफी व कापड बाजार, बोहरी आळी, मार्केटयार्डात ग्राहकांची संख्या मंदावली होती. सायंकाळी कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, फग्युर्सन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, सातारा रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम होता. पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस कायम असणार आहे. जिल्ह्यातील घाट विभागात मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, आज (मंगळवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 
 
उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले 
 
संपूर्ण कोकण, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा सोमवारी मान्सूनने व्यापला. विदर्भाचा उत्तर भाग वगळता उर्वरित भाग मान्सूनने व्यापला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्र आणि गुजरातचा काही भाग तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणाचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगढ, ओडिसाचा काही भाग व्यापला आहे. दक्षिण गुजरात व लगतच्या भागात चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
 
२४ तासांतील पाऊस 
 
एनडीए ५४.५ मिमी
पाषाण ४९.३ मिमी
शिवाजीनगर ३६.१ मिमी
मगरपट्टा ३०.५ मिमी
लोहगाव २७.८ मिमी
हडपसर २७ मिमी
 
धरण क्षेत्रातील पाऊस
 
धरण पाऊस टीएमसी टक्केवारी
खडकवासला ६० मिमी ०.९५ ४८.३१
पानशेत ११२ मिमी १.६५ १५.४९
वरसगाव १२३ मिमी ३.९ २४.१६
टेमघर १०५ मिमी ०.७ १.९७
एकूण ४०० मिमी ५.७७ १९.८१

Related Articles