विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या   

ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत  

पुणे : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर पुन्हा सोमवारी विद्यार्थ्यांनी शाळा गजबजल्या. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, औक्षण करत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. शाळांचे परिसर रांगोळ्या, फुलमाळा, तोरणे, फुगे, सजावट आणि संगीताच्या गजराने सजवले गेले होते. काही विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस असल्याने आई-बाबांना सोडून शाळेत जायचे असल्याने विद्यार्थ्यांना एकीकडे रडू येत होते, तर आपल्याला नवीन आणि जुने मित्र-मैत्रिणी भेटणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंदही दिसत होता. विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पमालांनी शहर परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 
 
विदर्भ वगळता संपूर्ण राज्यातील शालेय शिक्षणाचे २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये फुलांची आणि फुग्यांची सजावट, रांगोळीच्या पायघड्या, विविध वेशभूषेतील कलाकारांनी  विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांचा शाळेचा पहिला दिवस कायम आठवणीत राहावा, म्हणून प्रत्येक शाळेने वेगवेगळे उपक्रम राबवीत प्रवेशोत्सव साजरा केला.
 
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी सहायक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे, मुख्याध्यापिका आरती पोळ आदी उपस्थित होते. 
 
मिसाळ म्हणाल्या, राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
 
विविध उपक्रमांनी दिवस ठरला संस्मरणीय
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळांचे परिसर रांगोळ्या, फुलमाळा, तोरणे, फुगे, सजावट आणि संगीताच्या गजराने सजवले गेले होते. विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पमालांनी स्वागत, खाऊ वाटप, गोष्टी सादरीकरण, सरस्वती वंदना, आणि शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांनी दिवस संस्मरणीय ठरला.
 
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे विद्यार्थ्यांचे स्वागत खाऊ वाटप आणि सभागृहातील विशेष कार्यक्रमाने करण्यात आले. मुख्याध्यापिका सुनीता राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 
 
पपेट शोचे आयोजन
 
न्या. रानडे बालक मंदिर शाळेत मुलांचे स्वागत फुलांच्या माळा, तोरणे, रंगीबेरंगी फुगे, रांगोळ्या आणि पायघड्यांनी करण्यात आले. प्ले ग्रुप व मिनी केजीच्या विद्यार्थ्यांसाठी पपेट शो सादर करण्यात आला. मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळा, टिळक रोड येथे शाळेच्या सुरुवातीला शिक्षिकांनी ढोल, लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही विद्यार्थी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे आणि शाहू महाराज यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशाला येथेही प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळ्या, फुलमाळांनी सजवलेल्या प्रवेशद्वारातून झाले. अधिकारी वसुधा शिंदे यांच्या हस्ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच वाटप करण्यात आले. एन. ई. एम. एस. शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून सनईच्या नादात स्वागत करण्यात आले. 
 
गुलाब पुष्प देऊन महापालिकेच्या शाळांत स्वागत
 
पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन स्वागत यावेळी करण्यात आले. त्यांच्या स्वागताला आंतरराष्ट्रीय पुरस्काराप्राप्त साहसी गिर्यारोहक उमेश झिरपे व आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक १ आणि डॉ.  वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, शिरीष मोहिते, अमर लांडे, विक्रांत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.

Related Articles