खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली   

अमेरिकेच्या अधिकार्‍याचा गौप्यस्फोट; इस्रायलचा प्रस्ताव फेटाळला 

वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांंची हत्या करण्याची योजना इस्रायलने आखली होती. तशी कल्पना अमेरिकेला दिली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी कारस्थान पार पाडण्यास तीव्र विरोध केला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या अधिकार्‍याने केला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला खामेनी यांना ठार करण्याची योजना तयार केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी इस्रायलने दिली होती. योजनेचा तपशील पुरविला होता. मात्र, व्हाइट हाऊसने इस्रायली अधिकार्‍यांना योजनेची अंमलबजावणी करु नका, असे सांगून विरोध केला होता, असे एका अमेरिकन अधिकार्‍याने प्रकरण संवेदनशील असल्याने त्यावर अधिक वाच्यता करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे.
 
इस्रायलने सैन्य कारवाई अणु कार्यक्रमावर अंकुश आणण्यापुरती करावी, अशी भूमिका अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने घेतली होती संघर्ष मर्यादित राहावा तो अधिक पसरू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. खामेनी यांच्या हत्त्या केली तर परिसरात युद्धाचा आणखी भडका उडेल, असे अमेरिकेला वाटत होते.खामेनी यांच्या हत्त्येच्या योजनेबाबत फॉक्स न्यूज चॅनेलने एक विशेष वृत्त प्रसारीत केले होते. याबाबत ब्रेट बेईर यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी म्हटले  होते की, इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी खामेनी यांच्यासंदर्भातील योजनेबाबत थेट असे काही सांगितले का किंवा व्हाइट हाऊसने कारस्थानाला विरोध केला होता का ते मला माहीत नाही. 
 
दरम्यान, नेतन्याहू म्हणाले होते की,  मी तुम्हाला सांगतो की, आम्हाला जे काही करायचे ते करणार आहोत. जेव्हा वाटेल तेव्हा करणार आहोत. अमेरिकेला आमचे भले काय आहे ते चांगलेच माहीत आहे. इराणमध्ये सत्तापालट झाला तर त्याचे परिणाम चांगले होतील. इराणचे सरकार कमकुवत असल्याने संघर्ष उफाळून आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी इस्रायलच्या प्रस्ताावाला विरोध केला असल्याचे वृत्त रुटरने प्रथम दिले होते. त्यावर नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने कोणतेही वक्तव्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता.  

अमेरिकेची भूमिका

इराणने एकाही अमेरिकेच्या नागरिकाची हत्या केलेली नाही तसेच अमेरिकेविरोधात कोणतेही आक्रमक पाऊल उचलले नाही.  त्यामुळे खामेनी यांची हत्या करण्याची योजना स्वीकारणार नाही, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेऊन इस्रायलचा प्रस्ताव धुडकावून लावला असल्याचे वृत्त आहे.  

इस्लामी देशांनी एकत्र यावे : शरीफ

इस्लामाबाद : इराणवरील इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध पाकिस्तानने तातडीने केला आहे. तसेच इस्रायलविरोधात सर्व मुस्लिम धर्मीय  देशांनी एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केले.
 
अण्वस्त्र निर्मितीत इराण गुंतल्याचा संशय आल्यानंतर इस्रायलने अणु कार्यक्रम राबविणार्‍या ठिकाणांवर आणि लष्करी तळावर नुकताच हल्ला केला आहे. यानंतर इराणवरील हल्ला सर्व मुस्लिम धर्मीय देशांवरील हल्ला असल्याचा जावई शोध लावत पाकिस्तानने या संघर्षात उडी घेतली आहे. आता तर त्याने सर्व मुस्लिम धर्मीय देशांनी इस्रायलविरोधात एकत्र येण्याची हाक दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे.
 
दरम्यान, मुस्लिम धर्मीय देशांचा विचार करता .पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रे असलेला देश आहे. त्याच्याकडे १७० च्या आसपास अण्वस्त्रे आहेत. आता पाकिस्ताननंतर इराण हा अणुबाँब असणारा दुसरा मुस्लिम धर्मीय देश ठरणार आहे. त्याला इस्रायलने तीव्र विरोध करुन आक्रमक कारवाई केली. त्यामुळे एक मुस्लिम देश असल्याने पाकिस्तानने इराणला पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 
 

Related Articles