कर्‍हा जलाशय शंभर टक्के भरले   

जेजुरीकरांकडून विधिवत पूजन  

जेजुरी, (वार्ताहर) : उत्तर पूर्व पुरंदर आणि उत्तर पश्चिम बारामती तालुक्याची जीवनवाहिनी समजली जाणारी आणि ७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेले कर्‍हा नदीवरील नाझरे (मल्हार सागर) जलाशय १०० टक्के भरले असून, १९९४ सालानंतर प्रथमच जून महिन्यात जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. २५० क्यूसेकने जलाशयाच्या सांडव्यावरून विसर्ग होत असल्याची माहिती नाझरे पाटबंधारे शाखा अभियंता अनिल घोडके, वरिष्ठ कर्मचारी विश्वास पवार यांनी दिली.
 
दरम्यान, आषाढ मासाच्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून गुरुवारी जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी वर्गाच्या वतीने पापनाश तीर्थ (रंभाई शिंपींन कट्टा) येथे वाजत गाजत विधिवत पूजन, कर्‍हामाईला साडी चोळी अर्पण करीत भंडारा-फुलांची उधळण केली. तसेच महाआरती घेण्यात आली. यावेळी प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे, संजय खोमणे, हनुमंत खोमणे पाटील, रामदास माळवदकर, रोहिदास माळवदकर पाटील, पुजारी गणेश आगलावे, महेश आगलावे, विठ्ठल सोनवणे, सतीश घाडगे, काशिनाथ मोरे, सचिन कदम, दीपक राऊत, सुशील राऊत, भारत शेरे, कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त नितीन राऊत, सुधीर गोडसे, शिवराज झगडे, संदीप जगताप, नगरपालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, कर्मचारी अधिकारी वर्ग, आदींसह ग्रामस्थ मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त मंगेश घोणे यांनीही सपत्नीक  जलपूजन केले. पुजारी प्रसाद खाडे, गोविंद बेलसरे, शेखर सेवेकरी यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले. 
 

Related Articles