पाकिस्तानमध्ये डिझेल 262 रुपये लिटर!   

वृत्तवेध 

भारताला आपला शत्रू मानणार्‍या आणि दहशतवाद्यांना पोसण्यासाठी आणि लष्करी शक्ती वाढवण्यासाठी सतत पैसे खर्च करणार्‍या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तेथील लोकांना गुदमरणार्‍या गरिबीत जगण्यास भाग पाडले जात आहेत. अलीकडेच जागतिक बँकेचा एक अहवाल आला होता, त्यात असा इशारा देण्यात आला होता, की या वर्षी पाकिस्तानमधील सुमारे एक कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात. पाकिस्तानमध्ये कंबर कसणारी महागाई सातत्याने वाढत आहे. म्हणजेच एकीकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.
 
पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून जनतेवर भार टाकला आहे. पेट्रोलच्या किंमतीमध्ये 4.80 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर, पाकिस्तानमध्ये पेट्रोल आता 258.43 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याचप्रमाणे हाय स्पीड डिझेलमध्येही 7.95 रुपये वाढ करण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये डिझेलचे दर 262.59 रुपये प्रति लिटर झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील हे नवे दर पुढील पंधरा दिवसांसाठी लागू करण्यात आले आहेत.
 
जागतिक नाणेनिधीकडून आणखी एक बेलआउट पॅकेज मिळवण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला खूश करणे हा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सामान्य लोकांच्या रोजीरोटीवर थेट परिणाम होईल. प्रत्यक्षात, जागतिक नाणेनिधी आता पाकिस्तानवर मनमानी अटी लादत आहे. जागतिक नाणेनिधीने रोख पेमेंट करणार्‍यांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अतिरिक्त दोन रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता, तर डिजिटल पेमेंटवर दोन रुपयांची सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासोबतच पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलवर चालणार्‍या वाहनांवर कार्बन करदेखील प्रस्तावित केला होता.

Related Articles